कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने ३८ गाडय़ांचे वेळापत्रक तयार केले असून २० एप्रिल ते २ जून पर्यंत मुंबईहून सावंतवाडीसाठी विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्याशिवाय आणखीही काही फेऱ्या चालविण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न असला तरी या विशेष फेऱ्या त्वरित सुरू करण्यासाठी कोकण रेल्वेची घाई सुरू झाली आहे.
विशेष फेऱ्या सुरू करण्यामध्ये मध्य रेल्वेकडून वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप कोकण रेल्वेने केला आहे. मात्र कोणताही वेळकाढूपणा मध्य रेल्वेने केला नसून पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे २० एप्रिलपासून दादर-सावंतवाडी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी विशेष फेऱ्या सुरू होत आहेत, असे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वेलाच घाई झाली असून विशेष फेरीबाबत कोकण रेल्वेने उपस्थित केलेल्या प्रश्नावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.