मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे पायाभूत कामासाठी १ ते ३० जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात आला असून त्यामुळे ३० जूनपासून पुढील एक महिना मध्य आणि कोकण रेल्वे मार्गे धावणारी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस एलटीटीऐवजी पनवेलपर्यंत धावेल आणि पनवेलवरूनच सुटेल. त्यामुळे मुंबई महानगरात राहणाऱ्या कोकणवासीय प्रवाशांसह इतर प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होणार आहे.
गेल्या काही कालावधीपासून कोकण रेल्वेच्या लेटलतीफ कारभारामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. काही रेल्वेगाड्या सुमारे १० तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय झाला. त्यातच नुकताच सीएसएमटी येथील ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला, तेव्हा कोकणातून मुंबईत येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एलटीटीच्या यार्डमधील रेल्वेगाड्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या मर्यादित मार्गिकेचे (पिट लाइन) काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉक घेऊन नेत्रावती आणि मत्स्यगंधा या एक्स्प्रेस अंशतः रद्द करून थांबा बदलण्यात आला आहे.
हेही वाचा : अकरावी प्रवेश प्रक्रिया : पहिली प्रवेश यादी जाहीर
बदल काय ?
गाडी क्रमांक १६३४६ तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान दैनंदिन नेत्रावती एक्स्प्रेस ३० जून ते ३० जुलै या कालावधीत निर्धारित लोकमान्य टिळक टर्मिनस ऐवजी पनवेल स्थानकातच आपला प्रवास संपवणार आहे. तसेच गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी दैनंदिन नेत्रावती एक्सप्रेस १ ते ३० जुलै अशी संपूर्ण महिनाभर पनवेल येथूनच आपल्या प्रवास सुरू करणार आहे. गाडी क्रमांक १२६२० मंगळूर सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस ३० जून ते ३० जुलै या कालावधीत पनवेलपर्यंतच धावणार आहे. तसेच गाडी क्रमांक १२६१९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस १ ते ३० जुलै या कालावधीत पनवेल येथूनच मंगळूर सेंट्रलला जाण्यासाठी निघणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
© The Indian Express (P) Ltd