मुंबई : मुंबई – नायगाव – जुचंद्र असा नवा बायपास मार्ग टाकून बोरिवली हे कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथे कोकणवासीयांच्या मेळाव्यात सांगितले. हार्बर मार्ग बोरिवलीला जोडण्यासाठी आणि वंदे भारत गाडी सुरू करण्यासाठीही मंजुरी देण्यात आल्याचे वैष्णव यांनी नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास बंदी ; सुरक्षेसाठी पोलिसांचे आदेश

उत्तर मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी या मेळाव्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बोरीवली स्थानक कोकण रेल्वेला जोडण्यात यावे, गोरेगावपर्यंतचा हार्बर रेल्वे मार्ग बोरीवलीला जोडण्यात यावा, तसेच वंदे भारत रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी, अशा तीन मागण्या वैष्णव यांच्याकडे केल्या. त्यावर पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशांनुसार या तिन्ही कामांना मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत आणण्यासाठी ८२६ कोटी रुपयांची तर नायगाव – जुचंद्र बायपाससाठी १७६ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली. उत्तर मुंबईतील कोकणवासीयांशी संवाद साधून रेल्वेबाबतच्या त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वैष्णव या मेळाव्याला उपस्थित राहिले होते.या मेळाव्याला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सर्वश्री योगेश सागर, मनीषा चौधरी, सुनील राणे, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, विजय (भाई) गिरकर उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan railway route will connect with borivali says railway minister ashwini vaishnav zws