मुंबई : दोन आठवड्यावर होळी आली असून, मुंबईस्थित कोकणवासियांना कोकणातील मूळगावी जाण्याचे वेध लागले आहेत. कोकणवासियांनी नियमित रेल्वेगाड्यांची तिकीटे काढली असून काही जण तिकीट आरक्षित होण्याची वाट पाहत आहेत. तर, अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी आणि प्रवाशांना कोकणात जाता यावे यासाठी होळीनिमित्त कोकण रेल्वेवर विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, होळीनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१०६३ / ०१०६४ लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०१०६३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ६ आणि १३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता तिरुवनंतपुरम येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०६४ तिरुवनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ८ आणि १५ मार्च रोजी दुपारी ४.२० वाजता चालवण्यात येईल. ही रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी रात्री १२.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बिंदूर, कुंदापुरा, उडुपी, सुरतकल, मंगळुरू, कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरनुर, त्रिसूर, एर्नाकुलम, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिक्कर, कायमकुलम आणि कोल्लम या रेल्वे स्थानकांवर थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण २२ एलएचबी डबे असतील. यामध्ये द्वितीय वातानुकूलितचा एक डबा, तृतीय वातानुकूलितचे सहा डबे, शयनयानचे ९ डबे, सामान्य ४ डबे, जनरल कार एक, एसएलआरचा एक डबा असेल.
तसेच याआधी कोकण रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक ०११५१ सीएसएमटी ते मडगाव विशेष रेल्वेगाडी, गाडी क्रमांक ०११५२ मडगाव ते सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी, गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव, गाडी क्रमांक ०११३० मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी या रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष रेल्वेगाड्यांमुळे नियमित रेल्वेगाड्यांमधील गर्दी विभागली जाईल. तसेच नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षित तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षित तिकीट मिळू शकेल.