अभियंत्यांसाठी एक आश्चर्य मानल्या जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच या मार्गावरून शताब्दी एक्सप्रेस धावणार आहे. नाताळ आणि नववर्ष या निमित्ताने गोवा आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे १५ डिसेंबरपासून कोकण रेल्वेमार्गावर ही गाडी चालवणार आहे. सोमवार आणि गुरुवार वगळता आठवडय़ाचे पाचही दिवस धावणारी ही गाडी फक्त एका महिन्यासाठी म्हणजे १५ जानेवारीपर्यंत चालवण्यात येणार असून या गाडीचे आरक्षण शनिवार, १४ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. नाताळ आणि नववर्ष यांचा संयोग साधून प्रवाशांना लुबाडणाऱ्या खासगी बसचालकांना हा दणका आहे.
नाताळ व नववर्षांच्या निमित्ताने मुंबईहून कोकणात व गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या काही हजारांच्या घरात असते. या काळात चालवण्यात येणाऱ्या सर्व रेल्वेगाडय़ांचे आरक्षण कधीच संपलेले असते. त्यामुळे रेल्वेऐवजी अनेक जण खासगी बस किंवा एसटीचा पर्याय चाचपडतात. या काळात खासगी बसचालक मनाला येईल ती किंमत आकारतात. सध्या हा दर अडीच ते तीन हजार एवढा आहे. प्रवाशांना वेगळा आणि आरामदायक पर्याय उपलब्ध करून देण्याच्या विचाराने मध्य रेल्वेने या मार्गावर शताब्दी एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले.
दहा डब्यांची ०२११३ डाउन ही संपूर्ण वातानुकुलित गाडी सोमवार व गुरुवार वगळता दर दिवशी सकाळी ५.३० वाजता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण आणि रत्नागिरी हे थांबे घेऊन ही गाडी दुपारी २.०५ वाजता करमाळी (गोवा) येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ०२११४ अप ही गाडी करमाळीहून त्याच दिवशी दुपारी ३.२० वाजता निघून रात्री साडेबाराच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीत एक ‘एक्झिक्युटिव्ह’ वातानुकूलित खुर्ची डबा आणि सात वातानुकुलित डबे प्रवाशांसाठी असतील. तसेच प्रत्येक डब्यात खानपान सेवा पुरवली जाणार आहे.
या गाडीचे आरक्षण शनिवारपासून सुरू होणार आहे. या गाडीचे तिकीट दर अद्याप निश्चित करण्यात आले नसले, तरी एक्झिक्युटिव्ह खुर्ची डब्याचे तिकीट अडीच ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान असेल.

Story img Loader