मुंबई : मी एक लघुपट करण्यासाठी ईशान्य भारतात गेल्यानंतर तुम्ही ‘इंडिया’तून आला आहात का अशी भावना व्यक्त केली गेली तेव्हा मला एकाच देशातील या भागांमधील दरीची कल्पना आली. ईशान्य भारतात काम करणाऱ्या कोशन सुमेर यांना पुरस्काराने सन्मानित करण्याची संधी मिळाली ही अभिमानाची बाब आहे, असे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केले.
‘माय होम इंडिया’ संस्थेच्या ‘वन इंडिया पुरस्कार २०२१’ या पुरस्काराचा वितरण सोहळा बुधवारी मुंबईतील स्वातंर्त्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावर्षीचा पुरस्कार कोशन सुमेर यांना जाहीर करण्यात आला. यावेळी माय होम इंडियाचे संस्थापक तसेच भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
ईशान्य भारतात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी वन इंडिया पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा पुरस्काराचे ११ वे वर्षे असून यंदाचा पुरस्कार कोशन सुमेर यांना प्रदान करण्यात आला. साहित्य आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सुमेर यांनी मेघालयमध्ये सामजिक आणि इतर क्षेत्रातही काम केले आहे. मेघालयमधील क्रांतिवीर उक्यांग नागवा यांचा जीवनपट लिखित स्वरूपात जगासमोर मांडण्याचे काम सुमेर यांनी केले. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना यंदाच्या ‘वन इंडिया’ पुरस्काराने गौरविण्यात आले. एक लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘माय होम इंडिया’चे कौतुक
तुम्ही कोणत्याही ठिकाणी रहा, तुम्हाला घाबरण्याची, दु:खी होण्याची गरज नाही. मी समाजासाठी काय करू शकतो याचा विचार करत प्रत्यक्षात समाजासाठी काही तरी करणे म्हणजे माय होम इंडिया असे म्हणत राजदत्त यांनी ‘माय होम इंडिया’च्या कामाचे कौतुक केले.