मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादात राहिलेले राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा हेतू कोणत्याही महापुरुषांचा अनादर करण्याचा नव्हता. समाजाचे प्रबोधन करण्याचा होता, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.
राज्यपालपदी असताना कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यांचा विचार केला तर ती इतिहासाचे विश्लेषण करणारी आहेत. या वक्तव्यांतून राज्यपालांचा सामाजिक दृष्टिकोन दिसून येतो. तसेच त्यांचा हा समाजाभिमुख दृष्टिकोन आत्मसात आणि आचरणातही आणावा हा हेतू त्यांच्या वक्तव्यांमध्ये होता. त्यामुळे कोश्यारी यांनी केलेली वक्तव्ये ही कोणत्याही महापुरुषांचा अवमान करणारी असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नाही. त्यामुळे फौजदारी कायद्यानुसार ते कारवाईस पात्र ठरत नाहीत, असेही न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अभय वाघवासे यांच्या खंडपीठाने कोश्यारी यांच्यावर कारवाईची मागणी करणारी याचिका फेटाळताना नमूद केले.
आपल्या वक्तव्यांतून कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि मराठी माणसाचा अवमान केल्याचा आरोप करणारी आणि कोश्यारी यांच्यावर कारवाईची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. राज्यपालपदी असताना कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या विधानामुळे अनुसूचित जातीच्या समाजासह राज्यातील सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.