मुंबई एनसीबीने गुप्त माहितीच्या आधारे नांदेड जिल्ह्यात तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला. तसेच २ जणांना अटक केली. यानंतर एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने यावर प्रतिक्रिया दिली. क्रांती रेडकरने वृत्तसंस्था एएनआयच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर करत “ना रुकेंगे, ना थमेंगे”, अशी प्रतिक्रिया दिलीय. यातून क्रांतीने समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय.

“काम बोलता है, डायलॉगबाजी नही”

अभिनेत्री क्रांती रेडकरची इंस्टाग्राम स्टोरी

क्रांती रेडकरने आपल्या व्हेरिफाईड इंस्टाग्राम अकाऊंटवरून देखील याबाबत स्टोरी शेअर केलीय. यात तिने “काम बोलता है, डायलॉगबाजी नही” असं कॅप्शन दिलंय. यातून तिने आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधलाय.

नांदेडमध्ये नेमकी काय कारवाई झाली?

मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील नांदेड-हैदराबाद मार्गावर मंजराम (तालुका – नायगाव) येथे कारवाई केली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने विशेष मोहीम राबवत ही कारवाई केली. १५ नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी केलेल्या या कारवाईत एनसीबीने १२ चाकी ट्रक ताब्यात घेतला. यातून एकूण 1127 किलोग्रॅम गांजा जप्त केला. तसेच २ आरोपींना अटक केली. आता आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिलीय.

ट्रकमधील हा गांजा नांदेडमधून जळगावला जाणार होता. तिथं यातील काही गांजा देऊन ही गाडी पुढे महाराष्ट्रभरात गांजाचं वितरण करणार होती. ही मुंबई एनसीबीने केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानली जात आहे. या प्रकरणी एनसीबीने ९८/२०२१ या क्रमांकाने गुन्हा नोंद केला आहे. हा माल कुणाला पोहचवला जाणार होता याचा तपास सुरू आहे. लवकरच यातील इतर तस्करांनाही अटक केली जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader