आर्यन खान प्रकरणामुळे होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वादात सापडलेले समीर वानखेडे हे अंतर्गत चौकशीसाठी दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे ते जोरदार चर्चेत आले आहेत. या आरोपांसंदर्भातच वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेत हे सारे आरोप फेटाळले आहेत. त्याचबरोबर त्यांनी नवाब मलिक यांचे आरोप बिनबुडाचे असल्याची टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावरच्या या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुंबईत आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यात तिने वानखेडेंवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच ह्या आरोपसत्रामुळे आपल्याला त्रास होत असून पाणी डोक्यावरुन जायला लागलं तर आपण न्यायालयात धाव घेऊ असंही ती म्हणाली आहे.
यावेळी बोलताना क्रांती रेडकर म्हणाली, “समीर वानखेडे हे गेल्या १५ वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्या कामात कुठेही त्यांनी खोटेपणा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांना काहीही अर्थ नाही. ट्विटरवर कोणीही काहीही बोलू शकतं. पण त्याला काहीतरी ठोस बाजू हवी. समीर यांच्या शैलीमुळे अनेकांना त्रास होत आहे. समीर यांच्यामुळे काही लोकांना आपले स्वार्थ साध्य करता येत नाहीयेत. म्हणून अशा प्रकारे आरोप करण्याचं काम सुरू आहे. मात्र ते निश्चितच या सगळ्यातून बाहेर पडतील. कारण विजय सत्याचाच होतो”.
यासोबतच ती पुढे म्हणाली, “मला मराठी असल्याचा अभिमान आहे. मला देशभरातून समर्थनाचे मेसेज येत आहे. महाराष्ट्रातूनही अनेकांनी मला मेसेज केले आहेत. पण मला आणि माझ्या परिवाराला आपल्याच राज्यात कोणीतरी त्रास देत आहे, हे वाईट आहे. मला माझ्या राज्यात सुरक्षित वाटायला हवं ना? मला अनेकांनी शिव्या दिल्या आहेत, तुम्हाला जाळून टाकू अशा धमक्याही येत आहेत”.