आर्यन खानच्या अटकेपासून त्याच्या सुटकेपर्यंत गेल्या महिन्याभरात राज्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अजून देखील हा ड्रामा संपायचं नाव घेत नसून आता त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी देखील उडी घेतली आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सातत्याने टीका केल्यानंतर आता फडणवीसांनी देकील मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडे आणि यास्मिन वानखेडे यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना क्रांती रेडकरनं नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.

“आम्ही रडगाणं गायला गेलो नव्हतो”

“आम्ही राज्यपालांना एक निवेदन दिलं आहे. जे काही होतंय, ते सगळं आम्ही त्यांना सांगितलं आहे. हा सत्याचा लढा आहे. आमची फार मोठी काही तक्रार नाही. आमचं रडगाणं गायला आम्ही गेलो नव्हतो. आम्हाला फक्त ताकदीची गरज आहे. ती देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे” असं क्रांती रेडकर म्हणाली.

“ज्यांना वाट असेल की हे गरीब बिचारे इथून तिथे फिरत आहेत. पण तसं नाहीये. आम्ही सत्याचे योद्धे आहोत. राज्यपालांकडून आम्हाला आश्वासन मिळालं आहे. त्यातून आम्हाला स्फूर्ती मिळाली आहे. आम्ही सत्यासाठी लढणार आहोत. विजय निश्चित आमचाच होईल”, असा निर्धार क्रांतीनं बोलून दाखवला.

“जे काही चालू आहे, आम्हा कुटुंबियांना टॉंट केलं जातंय, खोटे पुरावे दाखवून अब्रूवर हल्ला केला जातोय या सगळ्या गोष्टी आम्ही राज्यपालांसमोर ठेवल्या आहेत. त्यांनी सांगितलं की थोडा धीर ठेवा, सत्याचाच विजय होणार. नवाब मलिक यांच्याकडून जी वैयक्तिक टीका केली जात आहे, ते देखील आम्ही त्यांना सांगितलं आहे”, असं ती म्हणाली.

Story img Loader