मुंबई : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशी झालेले आणि अलीकडेच भाजपमध्ये दाखल झालेले माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांच्या मतांसाठीच सिंह यांना महत्त्व देण्यात आले आहे.
शिवसेना आणि काँग्रेस असा प्रवास करून भाजपमध्ये दाखल झालेल्या नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे एकीकडे पक्षाची कोंडी झाली असतानाच, आता काँग्रेसमधून आलेल्या कृपाशंकर सिंह यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्य भाजपचे राजकारण अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांना हाताशी धरूनच सुरू झाले आहे. त्यामुळे त्याबाबतची प्रतिकूल प्रतिक्रि या पक्षात वर्षानुवर्षे खस्ता खाल्लेल्या नेत्यांमध्ये स्वाभाविकपणे उमटत आहे.
काँग्रेसमध्ये असताना कृपाशंकर यांच्या विरोधात कारवाईसाठी भाजपचे नेतेच आग्रही होते. भाजपनेते जवळपास दररोज कृपाशंकर यांच्या विरोधात पत्रके काढायचे. आता मात्र कृपाशंकर पक्षासाठी महत्त्वाचे नेते ठरले आहेत. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातील उत्तर भारतीयांची मते डोळ्यासमोर ठेवूनच भाजपने सिंह यांना पक्षात घेतले आणि आता त्यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती के ली, असे म्हटले जात आहे.