सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांची जबानी नोंदविली. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तालयात एकटेच आलेल्या कृपा यांची अतिरिक्त आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी अँटी चेंबरमध्ये बसवून खास चौकशी केली. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीने जबानी नोंदविली गेली असावी, अशी चर्चा आयुक्तालयात ऐकायला मिळत होती.
या प्रकरणी कृपाशंकर यांना पुन्हा बोलाविण्यात येण्याची शक्यता नसली तरी त्यांची पत्नी तसेच मुलगा, मुलगी, जावई आणि सुनांनाही चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे. कृपाशंकर यांची दुपारी आयुक्तालयात सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी सहकार्य केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचा तपास आठ आठवडय़ांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात दिले होते. सिंग आणि कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत विशेष पथकाच्या चौकशीबाबतचे दोन अहवाल राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाला बंद लिफाफ्यात सादर केले आहेत. सिंग यांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत विशेष पथकाने आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार चौकशी पूर्ण केल्यानंतर विशेष पथकाने कृपाशंकर यांना चौकशीसाठी बोलाविले, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
कृपाशंकर यांची अखेर एसआयटी चौकशी सुरू
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांची जबानी नोंदविली.
First published on: 16-10-2012 at 06:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kripashankar singh sit enquiry started