पोलीस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण
विधानभवनात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना गुरुवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विधान भवनात मंगळवारी पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना ठाकूर आणि कदम यांच्यासह १५ आमदारांनी मारहाण केली होती. सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीत ठाकूर आणि कदम यांना ओळखले होते. त्यावरून या दोघांना अटक करण्यात आली. सकाळी या दोघांचे जबाब नोंदविल्यानंतर त्यांना गुन्हे शाखा १ ने अटक केली. दुपारी ३ च्या सुमारास त्यांना किल्ला कोर्टात आणण्यात आले. सरकारी वकील किरण बेंडबर यांनी न्यायालयाला सांगितले की, मारहाण करणाऱ्या इतर आमदारांची ओळख पटलेली नाही. एवढय़ा कमी वेळात हे सर्वजण मारहाण करण्यासाठी एकत्र कसे जमले हे शोधण्यासाठी त्यांच्यातील मोबाईलचे संभाषणही तपासावे लागणार आहे. मारहाण करणारे सर्वपक्षीय आमदार असल्याने हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे सांगत त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी त्यांनी केली. बचाव पक्षाचे वकील अशोक मुंदरगी आणि राजन शिरोडकर यांनी पोलीस कोठडी देण्यास जोरदार विरोध केला. सरकारी कर्मचाऱ्यास कर्तव्यापासून परावृत्त करणे हे ३५३ कलम चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला. सूर्यवंशी यांना मारहाणीत झालेल्या जखमा वैद्यकीय अहवालात नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रकरणाच्या चित्रफीत पोलिसांकडे उपलब्ध असून पोलीस कोठडीसाठी विरोध केला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा