आठवडय़ाची मुलाखत : कुमार राजागोपालन
मुख्याधिकारी ‘रीटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया’
डोकलाम सीमा प्रश्नावरून चीनला धडा शिकवण्यासाठी या वर्षी दिवाळीची खरेदी करताना चिनी वस्तू खरेदी करू नका, असे संदेश समाजमाध्यमांमधून फिरत असले तरी बाजारात याच्या नेमके उलटे चित्र आहे. दिवाळीच्या निमित्ताने ग्राहक स्वस्त व मस्त चिनी वस्तूंनाच पसंती देत आहे. किंबहुना रोषणाईच्या माळा, कंदील, भेट म्हणून देता येतील लहानमोठय़ा वस्तूंना बाजारात पर्याय नसल्याने आणि या स्वस्त मालाची एव्हाना सवय झाल्याने मुंबईच्या बाजारपेठांमधील चिनी वस्तूंचे प्राबल्य कायम आहे. थोडक्यात चिनी वस्तूंच्या ड्रॅगनने भारतीय बाजारपेठेला गिळून टाकले आहे. चिनी वस्तूंची भारतीय बाजारपेठेवरील ही मोहिनी कायम का आहे, याचा ‘रीटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे मुख्याधिकारी कुमार राजागोपालन यांच्याची साधलेला संवाद..
* भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंचा प्रभाव नाही, असे म्हटले जात आहे यात कितपत तथ्य आहे?
आज जगात सर्वात मोठा उत्पादनक्षम देश म्हणून चीनकडे पाहिले जाते. यामुळे अगदी इलेक्ट्रॉनिक्सपासून गणपतीच्या मूर्तीपर्यंत सर्वच बाबतीत चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारात शिरकाव केला आहे. सणासुदीच्या काळात म्हणजे गणपती, दिवाळी आणि ख्रिसमस या काळात तर देशभरातील बाजारपेठेमध्ये चिनी वस्तूंचा प्रभाव दिसून येतो. या वस्तू स्वस्त आणि मस्त या प्रकारातील असतात. यामुळे लोक या वस्तू खरेदी करण्यास पसंती देतात. लोकांना सणासुदीच्या काळात खरेदी होणाऱ्या इलेक्ट्रिकच्या माळा, कंदील, पणत्या या सर्वामध्ये टिकाऊपणाबाबत काहीही अपेक्षा नसते. यामुळे चिनी वस्तूंना प्राधान्य दिले जाते. मोठय़ा वस्तूंचा विचार केला असता आज अनेक बडय़ा कंपन्यांचे उत्पादन हे चीनमध्येच होते. यामुळे एकूणच भारतीय बाजारात चिनी वस्तूंचा चांगलाच प्रभाव आहे. यात काही क्षेत्र असे आहेत की जेथे आजही भारतीयांचे वर्चस्व आहे. यात कपडे आणि चप्पल बुटांचा बाजार. या दोन क्षेत्रांमध्ये भारतीय कंपन्यांनाच प्राधान्य दिले जात आहे.
* देशातील सणांची माहिती घेऊन त्याला लागणाऱ्या वस्तू चिनी कंपन्यांना कसे जमते?
त्यामागे बाजारपेठेचा अभ्यास वगैरे असे काही नाही आहे. जास्तीत जास्त उत्पादन करायचे ही चिनी मानसिकता या सर्वाला कारणीभूत आहे. एखाद्या व्यक्तीने तेथील उद्योजकाला जर एखादी रचना दाखविली तर त्याची हुबेहूब नक्कल करून ती वस्तू जास्तीत जास्त वेगाने विकसित करण्याचे काम तेथील कंपन्या करतात. उत्पादन करण्यासाठी कंपन्यांना चिनी सरकारकडून खूप सवलतीही दिल्या जातात. यामुळे ते उत्पादनावर विशेष भर देतात. काही वर्षांपूर्वी खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वस्तूंपर्यंत मर्यादित असलेली चीनची उत्पादन क्षमता गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये कंदील, पणत्या, देव-देवतांच्या मूर्ती इथपर्यंत पोहोचली आहे.
* चिनी वस्तू विरोधातील प्रचाराचा बाजारावर काही परिणाम झाला आहे का?
असे काहीही झालेले नाही. भारतात दरवर्षी सुमारे ६५०० करोड रुपयांच्या चिनी मालाची विक्री होते. यातील ४५०० करोड मालाची विक्री ही सणासुदीच्या काळात होते. ही आकडेवारी केवळ सणासुदीच्या बाजाराची आहे. या व्यतिरिक्त मोबाइल, टीव्ही इत्यादी बाजारपेठेतील आकडा वेगळा आहे. ग्राहकांना चिनी उत्पादने स्वस्तात मिळतात. तसेच त्या काही प्रमाणात आकर्षकही असतात. यामुळे ग्राहक चिनी उत्पादनांनाच पसंती देत आहेत. परिणामी बाजारात चिनी वस्तूच जास्त विकल्या जात आहेत. भारतीय बनावटीच्या वस्तूंचा विचार केल्यास स्वत:हून कोणी मागितले तर त्यांना ते दाखविले जाते. पण चिनी उत्पादनाच्या आकर्षणापुढे भारतीय वस्तूंचे आकर्षण कमी होते. केवळ ज्या ग्राहकांना टिकाऊ वस्तू घ्यायच्या आहेत, ते लोक भारतीय वस्तू घेणे पसंत करतात. तसेच देशात आजही चीनच्या तुलनेत खूप कमी उत्पादने बनतात. यामुळेही चिनी बाजारपेठ तग धरून आहे. पण केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’सारख्या योजनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यात राज्य सरकारांनीही साथ दिली तर पुढील दोन ते तीन वर्षांत भारतात हे चित्र नक्कीच बदलेल. तसेच आपण जगात चीनला पर्याय ठरणारे उत्पादन निर्मिती राष्ट्र बनू शकतो.
* दिवाळीत मोठय़ा प्रमाणावर ऑनलाइन सेल आयोजित करण्यात आले आहेत. याचा ऑफलाइन बाजारपेठेला काही फरक पडला आहे का?
काही विभागांत हा फरक नक्कीच पडला आहे. यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने घडते ती म्हणजे ऑनलाइन बाजारात एखाद्या वस्तूची किंमत त्याच्या मूळ किमतीपेक्षा खूप कमी करून विकली गेली तर ऑफलाइन बाजारातही त्या वस्तूचे स्पर्धात्मक मूल्यच आकारावे लागते. यामुळे ना ऑनलाइन कंपन्यांचा नफा होतो ना ऑफलाइन दुकानदारांचा. यामुळे कोणाचाच फायदा होत नाही. तसेच सध्या लोक ऑनलाइन किमती पाहून थेट बाजारातून त्याच किमतीत ती वस्तू विकत घेण्यासाठी जातात. हल्ली याकडे कल वाढला आहे.
– मुलाखत : नीरज पंडित