Kunal Kamra Case Update Mumbai Police : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केल्याप्रकरणी प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस कुणाल कामराचा शोध घेत असतानाच कुणालने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. मद्रास न्यायालयाने त्याचा अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, खार पोलिसांनी कुणाल कामरा याला चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. दोन वेळा समन्स बजावूनही कुणाल कामरा खार पोलीस ठाण्यात हजर झालेला नाही.
कुणाल कामरा याने २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ‘युनिकॉन्टिनेंटल’ हॉटेलमधील ‘द हॅबिटॅट’ या स्टुडिओमध्ये ‘नया भारत’ हा स्टॅण्ड अप कॉमेडी शो आयोजित केला होता. याच शोमध्ये त्याने एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक कविता सादर केली होती. या शोमध्ये जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांना देखील पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. पोलीस या शोमधील प्रेक्षकांचे जबाब नोंदवणार असून काही प्रेक्षकांचे जबाब घेण्यास सुरुवात झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पोलीस प्रेक्षकांना नोटीस बजावू शकतात का?
मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १७९ अंतर्गत प्रेक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत. या कलमांतर्गत पोलिसांना प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे. माजी आयपीएस अधिकारी व वकील वाय. पी. सिंह टाईम्स ऑफ इंडियाला म्हणाले, पोलिसांना या शोमधील एक-दोन प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे. मात्र, या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असल्याने प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याची आवश्यकता नाही.
पोलिसांकडून कुणाल कामराच्या आई-वडिलांकडे चौकशी
दरम्यान, दोन वेळा समन्स बजावूनही कुणाल कामरा चौकशीसाठी हजर झालेला नाही. त्यामुळे खार पोलीस मुंबईतील माहिम येथील कुणाल कामरा याच्या वडिलांच्या घरी दाखल झाले. त्यांनी कुणाल कामराच्या पालकांकडे चौकशी केली. कुणालशी संपर्क झाला आहे का? तो मुंबईत येणार आहे का? चौकशीसाठी हजर होणार आहे का? असे प्रश्न पोलिसांनी कुणालच्या आई-वडिलांना विचारले.
पोलीस वेळ व यंत्रणा वाया घालवत आहेत : कुणाल कामरा
दरम्यान, पोलिसांनी आई-वडिलांकडे चौकशी केल्याचं समजताच कुणाल कामरा याने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की ज्या घरात मी १० वर्षांपासून राहत नाही, तिथे जाऊन पोलिसांनी चौकशी केली.या सगळ्यासाठी पोलीस त्यांचा वेळ व यंत्रणा वाया घालवत आहेत.