तामिळनाडू आणि केरळला फिरायला गेलेल्या एका बँकिंग अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी तत्काळ बोलावून घेतले. कुणाल कामराप्रकरणातील चौकशीसाठी त्याला नोटीस बजावून मुंबईत बोलावून घेण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी आता कुणाल कामराने प्रतिक्रिया दिली आहे.

खारघर येथे राहणारा संबंधित व्यक्ती १७ दिवसांच्या सहलीसाठी गेला होता. तो ६ एप्रिल रोजी नवी मुंबईत परतणार होता. पण त्यांना २८ मार्च रोजी मुंबई पोलिसांचा फोन आला. त्यानतंर दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांकडून व्हॉट्सअॅपवर नोटीसही आली. नोटिशीत त्याला सीआरपीसीच्या कलम १७९ अंतर्गत ३० मार्च रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलंय.

मी फिरायला गेल्याने पोलिसांना संशय

“मी २१ मार्च रोजी मुंबईहून सहलीसाठी निघालो होतो आणि ६ एप्रिल रोजी परतणार होतो. पण मी तामिळनाडूमध्ये असताना पोलिसांकडून वारंवार फोन आल्यानंतर मी मध्येच परतलो. ज्या अधिकाऱ्याने मला फोन केला तो माझ्या शहराबाहेरील स्थितीबद्दल संशयी होता आणि त्याने माझ्या खारघर येथील निवासस्थानी जाण्याची धमकी दिली. यामुळे मी माझी सहल अर्धवट थांबवून लवकर परतलो”, असे त्या माणसाने सांगितलं.

“मी शोचे तिकीट ऑनलाइन बुक केले आहे आणि माझ्याकडे बुकिंगचा पुरावा आहे असं सांगूनही, पोलिसांनी सांगितले की कामराने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मी एडिट केला असावा. तो विनोदी कलाकार त्याच्या शोचा व्हिडिओ मला (एडिटिंगसाठी) का देईल?”

प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावले नाही

मंगळवारी मुंबई पोलिसांनी सांगितले की कामराच्या शोच्या प्रेक्षकांना अशा कोणत्याही नोटीस बजावण्यात आल्या नाहीत , असे पीटीआयच्या वृत्तात आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कोणत्याही प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही.

दरम्यान, ही बातमी प्रसिद्ध होताच कुणाल कामराने एक्सवर पोस्ट केली आहे. कुणाल कामरा म्हणाला, माझ्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी मनापासून दिलगीर आहे. कृपया मला ईमेल करा जेणेकरून मी तुमची पुढची सुट्टी भारतात कुठेही मी शेड्यूल करू शकेन.”