मुंबई : विनोदकार कुणाल कामराने विनोदाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटले. शिंदे यांचा अवमान करणाऱ्या कामरा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत सत्ताधाऱ्यांनीच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ घालत कामकाज बंद पाडले. ‘स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. शिंदे यांना अपमानित करणाऱ्या कामरा यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिल्यानंतर या वादावर पडदा पडला.

कुणाल कामरा याने त्याच्या एका कार्यक्रमात गाण्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा अवमान केल्याचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटले. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या (शिंदे) सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत कामरा यांच्यावर कारवाईची मागणी केली. विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे अर्जुन खोतकर यांनी शिंदे यांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करताना, कामरा यांनी यापूर्वीही सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली आहेत. तसेच तो सातत्याने समाजात धार्मिक भावना भडकावून द्वेष पसरविण्याचे काम करीत असून त्याच्या या वक्तव्यामागचा सूत्रधार शोधण्याची मागणी खोतकर आणि शंभूराज देसाई यांनी केली. या वेळी सत्ताधारी सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत, कामरा यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करीत गोंधळ घातला. त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

कामरा यांनी शिंदे यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निषेध केला. शिंदे यांच्याबद्दल हीन दर्जाचा विनोद करून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. असे अपमानित करणे चुकीचे आहे. ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेला आदर आहे. त्यांचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसदार कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेले आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे सांगत फडणवीस यांनी कामरा यांच्यावर कठोर कारवाईची ग्वाही दिली.

अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा स्वीकार केला जाईल पण या स्वातंत्र्याचा स्वैराचार आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. राजकीय विनोद करा, व्यंग करा पण प्रसिद्धीसाठी जर कोणी कोणाला अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

विधान परिषदेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने

कुणाल कामरा वादाचे जोरदार पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. विरोधकांनी स्टुडिओची मोडतोड केलेल्यांविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली, तर सत्ताधाऱ्यांनी कामराविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. सत्ताधारी- विरोधक आमनेसामने आल्याने सभागृह तीन वेळा तहकूब करावे लागले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे कामराचा कार्यक्रम झालेल्या स्टुडिओची मोडतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड करणे योग्य नाही, सत्ताधाऱ्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याची गरज होती, असे मत व्यक्त केले. त्याला प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला.

सामंत म्हणाले, कुणाल कामराने आजवर अनेकांचा अवमान केला आहे. देशातील राजकीय नेत्यांचा अवमान करण्याचा अधिकार कामराला कुणी दिला. कामराचा बोलविता धनी कोण आहे, याचा तपास करण्याची गरज आहे. सामंत यांच्यानंतर प्रसाद लाड बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी कामरावर कठोर कारवाईची मागणी केली. दरेकर यांनी जिथे असेल तिथून शोधून अटक करण्याची मागणी केली.

राहुल कनालसह १२ जणांना अटक

मुंबई : विनोदकार कुणाल कामराप्रकरणी खारच्या युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन शिवसेना शिंदे गटाने मोडतोड केली. या प्रकरणी खार पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्यासह १२ जणांना अटक केली. त्यांची १५ हजार रुपयांच्या जातमुलचलक्यावर सुटका करण्यात आली. खार पोलिसांनी स्वत: याप्रकरणी तक्रार दाखल केली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय सैद यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी सोमवारी पहाटे याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार पोलिसांची तीन वाहने घटनास्थळी पोहोचली असता स्टुडिओमध्ये कार्यकर्ते शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत होते. त्यांनी तेथे जाऊन कार्यक्रम बंद केला. तसेच तेथील प्रेक्षकांना बाहेर काढले. तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ केली. प्रेक्षकांना हॉटेलमधून बाहेर जाण्यासाठी सांगत असताना तेथे मोठा जमाव होता. त्यावेळी स्थानिक नेते राहुल कनालसह कार्यकर्त्यांची गर्दी होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर टीका

मुंबई : कुणाल कामराने त्यांच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नाही तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वत:वर ओढवून घेऊन मोडतोड केली. हल्ला करणारे सरकारमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा सरकार, संविधान, कायदा व गृहविभागावर विश्वास नाही का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामराची पाठराखण केली. जे चोरी करतात ते गद्दारच आहेत, त्याच्या स्टुडिओची मोडतोड करणारे भेकड असून कामराने सत्य जनभावना मांडल्याचे वक्तव्य केले. या गद्दारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर, सोलापूरकर दिसत नाहीत. कोश्यारी यांनी अपमान केला तेव्हा त्यांचा निषेध करण्याचे धाडस नव्हते, अशी टीका ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. गद्दाराला गद्दार, रिक्षावाल्याला रिक्षावाला, बेइमानाला बेइमान, असे नाही तर काय म्हणणार, असा प्रश्न शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची व्याख्या समजून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संविधान वाचावे लागेल, समजून घ्यावे लागेल, असे राऊत म्हणाले.

शिवसेना शिंदे गट आक्रमक

कुणाल कामराच्या उपासात्मक गाण्यावरुन शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आक्रमक झाले. शिंदे यांच्यावरील टीका सहन केली जाणार नाही, असा इशारा उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी दिला. कामरा हा शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांचा खास मित्र असून कामराच्या स्टुडिओसाठी ‘मातोश्री’वरून पैसे दिले गेले आहेत, असा आरोप शिंदे पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी केला. कामरा याने शिवसेना ठाकरे पक्षाची सुपारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अवमानकारक गाणे केले. कामरा हा काँग्रेस पक्षाचा एक भाग असून त्याचे राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी संबंध असल्याचे निरुपम यांनी सांगितले. कामरा याने शिंदे यांची जाहीर माफी मागावी असे, शिवसेना नेत्या डॉ. मनिषा कायंदे व शीतल म्हात्रे यांनी सांगितले.

विनोदातून वादंग

● ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्नब गोस्वामी यांच्यावर विमानप्रवासादरम्यान वाद घालून त्याचे चित्रण केल्याबद्दल कामरा याच्यावर चक्क विमानप्रवास बंदी लादण्यात आली होती.

● यावर्षी सुरुवातीलाच रणबीर अलाहबादिया आणि समय रैना या विनोदकारांना ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधील विधानांवरून पोलीस चौकशीला तोंड द्यावे लागले.

● २०१५मध्ये ‘एआयबी नॉकआऊट’ कार्यक्रमात केलेल्या ‘अश्लाघ्य, अश्लील’ टिप्पणीबद्दल दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता अर्जून कपूर, अभिनेता रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट यांच्यासह कार्यक्रम आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

● ‘एआयबी’शी संबंधित विनोदकार तन्मय भट याने २०१६मध्ये दोन नामवंत व्यक्तिमत्वांतील बनावट संभाषण सादर केल्याबद्दल त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

● ‘स्टॅण्डअप कॉमेडी’च्या माध्यमातून सामाजिक, राजकीय विषयांवर व्यंगात्मक भाष्य नेहमीच होतो. मात्र, अशा कार्यक्रमांत विनोदनिर्मितीच्या प्रयत्नात वाद निर्माण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कुणाल कामरा याच्यावरच अशा काही अन्य प्रकरणांत पोलीस तक्रारी, राजकीय टीका, खटले दाखल झाले आहेत.

● अभिनेता सलमान खान याच्या १९९९च्या काळविट शिकार आणि २००२च्या रस्ते अपघात प्रकरणावर केलेल्या विधानांवरून कामरा गतवर्षी चर्चेत आला होता.

● ‘ओला’ कंपनीच्या दुचाकीबाबतच्या तक्रारींवर समाजमाध्यमावर केलेल्या टिप्पणीमुळे कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल आणि कामरा यांच्या शाब्दिक युद्ध रंगले होते. ● २०२०मध्ये भाजप, न्याययंत्रणा तसेच सरकारी व्यवस्था यांवर केलेल्या भाष्यांप्रकरणी कामरा याच्यावर खटले दाखल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाबद्दल केलेल्या टिप्पणीमुळेही त्याच्यावर अवमानना खटला दाखल करण्यात आला.