मुंबई/नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रसिद्ध झालेल्या विडंबनात्मक गाण्यावरून राज्यात वादंग उठले असताना, विनोदकार कुणाल कामरा याने ‘मी माफी मागणार नाही आणि वाद शांत होण्याची वाट पाहत कुठे लपूनही बसणार नाही,’ असे सोमवारी रात्री निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कामरा याला विनोदाबद्दल माफी मागण्यास सांगितले. तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्री आणि भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांनीही कामराला माफी मागण्यास बजावले. परंतु कार्यक्रमस्थळावरील तोडफोडीला निरर्थक म्हणून टीका करणाऱ्या कामराने zझुकण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्याने सोमवारी रात्री निवेदन प्रसिद्ध केले.
‘मी माफी मागणार नाही. मी जे बोललो तेच अजित पवार (पहिले उपमुख्यमंत्री) यांनी एकनाथ शिंदे (दुसरे उपमुख्यमंत्री) यांच्याबद्दल म्हटले होते. मला जमावाची भीती वाटत नाही आणि परिस्थिती शांत होण्याची वाट पाहत मी कुठेही लपून बसणार नाही.’
‘आमच्या भाषण आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांवर टीका करण्यासाठी वापरला जात नाही. एका शक्तिशाली सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीवरील विनोद न स्वीकारण्याची तुमची असमर्थता माझ्या अधिकाराचे स्वरूप बदलत नाही. माझ्या माहितीनुसार, आपल्या नेत्यांची आणि आपल्या राजकीय व्यवस्थेच्या सर्कसची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही’, असेही त्याने म्हटले आहे.
विनोदकार कुणाल कामरा याने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीला अवघ्या दोन दिवसांत ४३ लाखांहून अधिक ‘व्ह्यूज’ मिळाले आहेत. त्याच्या इन्स्टाग्रामवरील माहितीनुसार, पाँडिचेरीमध्ये असलेल्या कामराने त्याच्या ‘एक्स’ खात्यावरील छायाचित्र एका स्पष्टीकरणासह अद्यायावत केले आहे.
‘या कार्यक्रमात असभ्य भाषा, आक्षेपार्ह मजकूर आहे आणि ज्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, त्यांनी तो पाहण्यास अयोग्य आहे. प्रेक्षकांमुळे झालेल्या कोणत्याही आक्रोश किंवा दुखापतीसाठी तुम्हीच जबाबदार आहात’, असे त्याने म्हटले आहे.
पोलिसांचे समन्स
कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु कामराने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितल्याचे समजले. ती नोटीस कामराच्या वडिलांच्या निवासस्थानी पाठवण्यात आली होती. त्याच्या वडिलांनी ती स्वीकारल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पण कामरा सध्या मुंबई नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
कार्यक्रमांवर बंदीची मागणी
द्वेषपूर्ण भाषणांना प्रोत्साहन देणाऱ्या, समाजात तणाव निर्माण करणाऱ्या ‘स्टँड-अप कॉमेडी प्लॅटफॉर्म’वर बंदी घालावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी लोकसभेत केली. काही लोक ‘स्टँड-अप कॉमेडी’च्या माध्यमातून त्यांचा राजकीय अजेंडा चालवत असल्याचेही माने म्हणाले.
‘देशात अशी काही धोरणे किंवा चौकट असावी जिथे विनोदी कलाकारांना धोरणांवर टीका करण्याची परवानगी असावी, एखाद्या व्यक्तींविरुद्ध वैयक्तिक टिप्पणीसाठी परवानगी नसावी,’ असे खासदार माने म्हणाले.
पुन्हा नवी चित्रफीत
● कामरा याने मंगळवारी त्याच्या ‘स्टँड अप अॅक्ट’ची एक चित्रफीत नव्याने प्रसिद्ध करून त्याच्या भूमिकेत दुप्पट भर घातली. या चित्रफितीत त्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळ उद्ध्वस्त करताना आणि त्याचे छायाचित्र तसेच पुतळे जाळतानाच्या चित्रफिती प्रसिद्ध केल्या. तसेच ‘हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन…’ या विडंबनात्मक पार्श्वगीताची जोडही दिल्याने या वादत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
● दरम्यान, इन्स्टाग्रामवर कुणाल कामराच्या समर्थनार्थ अनेकांनी आवाज उठवला आहे. तसेच ‘एक्स’वर मणिपूरमधील बाल पर्यावरण कार्यकर्ती लिसिप्रिया कांगुजम हिने लिहिले की, ‘काही वर्षांपूर्वी, जेव्हा मी एकटी होते तेव्हा हा माणूस माझ्या बाजूने उभा होता. आज मी त्याच्या बाजूने उभी आहे. कितीही द्वेष त्याचा आवाज बंद करू शकत नाही.
शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी कामरा बरोबर असल्याचे सिद्ध केले आहे. कामराने कोणाचेही नाव घेतले नाही; त्याने फक्त गुवाहाटीला गेलेला आणि फडणवीसांचा बाहुला असलेला दाढीवाला माणूस म्हणून सांगितले. परंतु शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सर्वोच्च नेत्याबद्दल आणि त्या स्टुडिओची तोडफोड करण्याबद्दल काय वाटले? – प्रियंका चतुर्वेदी, खासदार, शिवसेना (ठाकरे)
तुम्ही विनोदाच्या नावाखाली एखाद्याला बदनाम करत आहात. त्याने केलेल्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहात. शिंदेजी काही काळापूर्वी ऑटो रिक्षा चालवत होते. आज ते स्वत:हून येथपर्यंत पोहोचले आहेत. त्याची (कामराची) ओळख काय? आपण जे बोलतो त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. त्याचे परिणाम होऊ शकतात. -कंगना राणावत, खासदार, भाजप