मुंबई : विनोदकार कुणाल कामरा याने एका ‘शो’मध्ये सादर केलेल्या विडंबनगीताने महाराष्ट्रात नवा वाद उद्भवला आहे. या गीताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली, तर मुंबई महापालिकेने योग्य ‘मुहूर्त’ साधत हॉटेल आणि स्टुडिओच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही असे सांगत कामरा यांच्यावर कठोर कारवाईची ग्वाही दिली, तर उद्धव ठाकरे यांनी कामरा याची पाठराखण करत शिंदेंवर हल्लाबोल केला.
कुणाल कामरा याने या विडंबनगीतात एकनाथ शिंदे यांचे थेट नाव घेतले नसले तरी त्याचे पडसाद रविवारी रात्रीपासून उमटण्यास सुरुवात झाली. कामराच्या कार्यक्रमाची चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित होताच संतापलेल्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलातील हॅबिटॅट स्टुडिओवर चाल केली. यात स्टुडिओतील साहित्य, दिवे यांची नासधूस करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेना पदाधिकारी राहुल कनाल यांच्यासह १२ जणांना अटक केली.
या सगळ्यांची सोमवारी सायंकाळी जामिनावर सुटका करण्यात आली. शिवसैनिकांच्या तक्रारीनंतर कामरा याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हॉटेल आणि स्टुडिओतील काही बांधकाम बेकायदा असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने हॉटेलसमोरील शेड आणि तळघरातील अनधिकृत बांधकाम हटवले. मात्र पालिकेने कारवाईसाठी साधलेली वेळ म्हणजे ‘बुलडोझर कारवाई’ असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
कामरा कार्यक्रमाचे पडसाद सोमवारी विधिमंडळातही उमटले. शिंदे यांचा अवमान करणाऱ्या कामरा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत सत्ताधाऱ्यांनीच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. ‘स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. शिंदे यांना अपमानित करणाऱ्या कामरा यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिल्यानंतर या वादावर पडदा पडला.
काही तासांत सहा लाख ‘व्ह्यूज’ गेल्या महिन्यात चित्रित झालेल्या कुणाल कामरा याच्या कार्यक्रमाची चित्रफीत रविवारी समाजमाध्यमांवर प्रसारीत झाली. या चित्रफितीत कामरा याने एका प्रसिद्ध बॉलिवूड गीताच्या चालीवर रचलेले विडंबनगीत सादर केले आहे. या चित्रफितीत एकनाथ शिंदे यांचे थेट नाव घेण्यात आले नसले तरी, त्यातील काही संदर्भ शिंदे यांच्याविषयी असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. यावरून गोंधळ सुरू झाल्यानंतर सोमवारी दिवसभरात हा व्हिडिओ सहा लाखांहून अधिक जणांना पाहिल्याचे ‘यु ट्यूब’वरील आकड्यांवरून दिसून आले.