Kunal Kamra Eknath Shinde Controversy Updates : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्यामुळे तो वादात अडकला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवेसनेच्या (शिंदे) नेत्यांकडून कामरा याला अटक करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, कुणाल कामरा सध्या मुंबईत नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तो तमिळनाडूमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. दूसऱ्या बाजूला कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी (२८ मार्च) त्याचा अंतरिम अटकपूर्व जामीनाचा अर्ज मंजूर केला आहे. पाठोपाठ मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामरा याला चौकशीसाठी समन्स बजावला आहे.
कुणाल कामरा आज खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. अटकेपासून संरक्षण मिळाल्याने तो चौकशीसाठी हजर राहू शकतो. खार पोलिसांनी त्याला समन्स बजावलं आहे.
Kunal Kamra Eknath Shinde Controversy Updates : कुणाल कामरा आज खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामरा याचा अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला असून त्याला सात एप्रिलपर्यंत दिलासा मिळाला आहे. मात्र, आता मुंबईत त्याच्याविरोधात तीन नवे गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई पोलिस या गुन्ह्यांप्रकरणी त्याला अटक करू शकतात. मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश या तीन नव्या एफआरआरवर लागू होणार नाही.
"कुणाल कामरा मुंबईत येताच त्याचं शिवसेना स्टाईलने वेलकम करणार", राहुल कनालचा इशारा
"फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची कुणाल कामराला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी", संजय राऊतांचा दावा
शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री कुणाल कामराला धमकावत आहेत, त्यामुळे कुणालच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. काहींनी त्याला गोळ्या घालून ठार करण्याची, फासावर टकवण्याची धमकी दिली आहे.
कुणाल कामराला दुसरं समन्स
कुणाल कामरा याला यापूर्वी देखील समन्स बजावण्यात आलं होतं. तेव्हा त्याने सात दिवसांचा अवधी मागितला होता. आता त्याला दुसऱ्यांदा समन्स धाडण्यात आलं आहे.
कुणाल कामरा देशप्रेमी : प्रशांत किशोर
वादात अडकलेल्या कुणाल कामराचा बचाव करण्यासाठी जन सुराज पार्टीचे संस्थापक व राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हे पुढे सरसावले आहेत. ते म्हणाले, कुणाल माझा मित्र आहे. तो देशावर प्रेम करतो. त्याची शब्दांची निवड चुकीची असू शकते मात्र त्याचा हेतू वाईट नव्हता.
“कुणाल कामराला धमक्यांचे ५०० फोन, शिवसेना स्टाईल धडा…”; वकिलांनी न्यायलयाला काय सांगितलं?
मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामरा याचा जामीन मंजूर केला आहे. यावेळी कामराच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितलं होतं की, त्याला (कुणाल कामरा) ५०० हून अधिक धमक्यांचे फोन आले आहेत. धमक्या देणारे त्याला म्हणतात की ते ‘शिवसेना स्टाईलने त्याला धडा शिकवतील’. ‘शिवसेना स्टाईल’ म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे… हॉटेलमध्ये तोडफोड करणाऱ्यांवर कोणतीही गंभीर कारवाई झाली नाही, त्यांना जामिनावर सोडण्यात आलं आहे. अशाच प्रकारचा धोका मलाही आहे. मी नेहमीच सांगत आलो आहे की माझा संविधानावर विश्वास आहे,”