कुणबी समाजातील मतांची बेगमी करत ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात गेली अनेक वर्षे स्वत:चे अस्तित्व कायम राखणारे कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपली संघटना काँग्रेस पक्षात विलीन करत असल्याची घोषणा केली.
शहापूर, पालघर, वाडा, भिवंडी ग्रामीण या चार तालुक्यांमध्ये पाटील यांच्या कुणबी सेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. भारतीय जनता पक्षाचे एकेकाळी सक्रिय पदाधिकारी असणारे पाटील यांनी वेगवेगळ्या निवडणुकांच्या निमित्ताने यापूर्वी शिवसेना, बहुजन विकास आघाडी, भाजप, राष्ट्रवादी अशा वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा दिला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी पाठिंब्याच्या राजकारणाला रामराम करत काँग्रेस पक्षात प्रवेश करत भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळी कुणबी सेनेकडून लढलेले विश्वनाथ पाटील यांनी भिवंडी ग्रामीण आणि शहापूर या दोन विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली होती. या मतविभाजनाचा फायदा गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना मिळाला होता. या मतदारसंघातील कुणबी समाजाची मते लक्षात घेता विश्वनाथ पाटील यांनी थेट काँग्रेस पक्षात प्रवेश करत एक प्रकारे सुरेश टावरे यांच्या उमेदवारीलाच आव्हान उभे केल्याची चर्चा आता रंगली आहे.
सन २००० पर्यंत भारतीय जनता पक्षाचे सक्रिय पदाधिकारी असलेले पाटील यांनी दशकभरापूर्वी कुणबी सेनेची स्थापना केली आणि जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठी आंदोलने उभी राहिली.  पुढे मात्र वेगवेगळ्या पक्षांना निवडणुकांच्या निमित्ताने पाठिंबा देण्यापुरते ओळखले जाऊ लागले. शिवसेना तसेच हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी अशा वेगवेगळ्या पक्षांना ते मदत करत राहिले. निवडणुका आल्या की कोणत्या तरी पक्षाला जाऊन खेटायचे, अशा पाठिंब्याच्या राजकारणापुरती कुणबी सेना ओळखली जाऊ लागल्याने या संघटनेच्या अस्तित्वाविषयी गेल्या काही वर्षांपासून प्रश्न उपस्थित केले जात
होते.
ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन लवकरच : मुख्यमंत्री
ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी विभाजनाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केले. कोकण विभागीय आयुक्तांनी विभाजनासंबंधीचा अहवाल राज्य सरकारला सादर केला असून त्यामध्ये ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे प्रस्तावित करण्यात आले आहेत. जिल्हा विभाजनाचा निर्णय लवकरच घेतला जाईल. यापूर्वी कागदावर राहिलेल्या कोकण विकास आर्थिक महामंडळाला निधी देऊन ते कार्यान्वित केले जाईल, अशी घोषणाही या वेळी मुख्यमंत्र्यांनी केली. रायगड आणि ठाणे जिल्ह्य़ांतील बेदखल कुळांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक समिती गठित केली जाईल, असेही ते या वेळी म्हणाले.