इराकच्या कुर्दिस्तान भागातील सुलेमानी प्रांताचे गव्हर्नर डॉ हवल अबूबकर यांनी बुधवारी (दि. २०) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने विशिष्ट अतिथींच्या भारतभेटीच्या कार्यक्रमांतर्गत डॉ. हवल अबूबकर यांच्या भारत भेटीचे आयोजन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इराकी आणि विशेषतः कुर्दीश भाषिक सुलेमानी लोक भारतीय संस्कृतीशी व भारतीय लोकांशी विशषत्वाने जोडले आहेत. भारत व कुर्दिश सुलेमानी प्रांतांचे ऐतिहासिक संबंध अधिक दृढ व्हावे यादृष्टीने आपण प्रयत्न करू, असे गव्हर्नर डॉ, अबूबकर यांनी राज्यपालांना सांगितले. भारत व कुर्दिश सुलेमानी प्रांतांमधील संबंध दृढ व्हावे या दृष्टीने एक कृती आराखडा तयार करावा अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली.

इराक भारताकडून तांदूळ, कपडे, इलेकट्रॉनिक उत्पादने आयात करत असून उभय देशांमधील व्यापारी संबंध वाढावे या दृष्टीने आपण येथील व्यावसायिक व चेंबर ऑफ कॉमर्सशी चर्चा केल्याचे डॉ. अबूबकर यांनी सांगितले. इराकमध्ये एक लाख भारतीय असून त्यापैकी ३५००० सुलेमानी प्रांतात राहतात. इराकमधील भारतीयांनी दूरसंचार, सिमेंट, पोलाद, व्यापार वाणिज्य व आरोग्य सेवा क्षेत्रात मोठे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. 

सुलेमानी प्रांतातील पर्वतरांगावर भारतीय देवी-देवतांची शिल्पे कोरली असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या सुलेमानी लोकांना भारतीय भाषा देखील अवगत होत्या. कुर्दिश भाषेच्या व्याकरणावर पाणिनी यांचा प्रभाव असल्याचे डॉ. अबूबकर यांनी सांगितले. 

जगभर ५० लाख कुर्दिश भाषिक लोक राहत असून यापैकी बहुतांश इराकी कुर्दिस्तान येथे राहतात तसेच इराण, तुर्की, व सिरिया येथे देखील राहत असल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व कुर्दिश भाषिक लोक भाषा व संस्कृतीच्या समानतेच्या धाग्याने बांधले असल्याचे त्यांनी सांगितले.  

बैठकीला इराणचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. गाझी अल-तोपि तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या विभागीय संचालिका रेणू प्रिथियानी उपस्थित होते. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kurdish slemani governor from iraq meets governor koshyari scsg