मुंबईः कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी पोलिसांनी बसमधील सीसीटीव्ही कॅमेरेचा डिव्हीआर जप्त केला आहे. त्यातील चित्रिकरणाच्या आधारे अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी आतापर्यंत २५ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले असून त्यात प्रवासी, प्रत्यक्षदर्शी, जखमी, बेस्ट कर्मचारी व परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे. याप्रकरणी आणखी व्यक्तींचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर कुर्ला पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवणे सुरू केले आहे. दरम्यान पोलिसांनी अपघातग्रस्त बसमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेचा डिव्हीआर ताब्यात घेतला आहे. सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती काढून त्यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणारे प्रवासी हे प्रत्यक्षदर्शी असून त्यांचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा >>>सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
बसवरील चालकाचे नियंत्रण कशामुळे सुटले याबाबत सर्वबाजूंनी तपास सुरू आहे. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांचा मृत्यू व ४० जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची स्थिती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी चालक १ डिसेंबरपासून इलेक्ट्रीक बस चालवत होता. त्यापूर्वी त्याला इलेक्ट्रीक बस चालवण्याचा अनुभव नव्हता. त्यासाठी त्याने अत्यल्प प्रशिक्षण घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, कंपनीने दिलेल्या माहितीनुसा चालकाने १० दिवसांचे इलेक्ट्रीक बस चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. या दाव्याची पडताळणी पोलीस करणार आहेत.
आरोपी चालक ३३२ क्रमांकाची बस चालवत होता. ती बस कुर्ला ते अंधेरी मार्गावर चालते. अपघातापूर्वी त्याने तीन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर हा गंभीर अपघात घडला. आरोपी चालकाने १ ते ९ डिसेंबर या कालावधीत कोणत्या मार्गावर बस चालवल्या, याबाबतचीही माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी चालकाला याप्रकरणी ११ दिवसांंची पोलीस कोठडी सुनावली असून याप्रकरणी कुर्ला पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी बसवरील ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याचे चौकशीत सांगितले आहे. पोलीस त्याबाबत अधिक तपास करत आहेत. याशिवाय आरोपी चालकाच्या मानसिक स्थितीची तपासणीही करण्यात येणार आहे. याशिवाय बसचीही परिवहन विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे.