मुंबई : दोन आठवड्यांपूर्वी कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरे हा घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नव्हता. तसेच, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता. त्यामुळे, मोरे याच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचा दावा करून पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला गुरुवारी विरोध केला.
आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून मोरे याने गेल्या आठवड्यात जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार यांच्यासमोर मोरे याच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी, पोलिसांच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रभाकर तरंगे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून मोरे याला जामीन देण्यास विरोध केला.
हेही वाचा – मुंबईतील किमान तापमानात ४ अंशांनी घट
दरम्यान, आपल्याला १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव आहे आणि विद्याुत बसमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही. किंबहुना, या अपघाताला जबाबदार असलेल्या प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी आपला बळी दिला जात असल्याचा दावा मोरे याने वकील समाधान सुलाने यांच्यामार्फत केलेल्या जामीन अर्जात केला होता. या प्रकरणात कोणत्याही बस कंत्राटदाराला अटक करण्यात आलेली नाही किंवा आरोपी करण्यात आलेले नाही. आपल्याला कार्यालयात बसून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि दिंडोशी बस आगारात विद्याुत बस चालवण्यास सांगितले. त्यानंतर, आपल्याला कुर्ला येथे बस चालवण्यास परवानगी देण्यात आली, असा दावाही मोरे याने केला होता. तसेच, या दुर्घटनेसाठी आपल्या एकट्याला जबाबदार धरता येणार नसल्याचा पुनरूच्चारही मोरे याने केला होता.
हेही वाचा – कर थकविल्याने शासनजमा जमिनी शेतकऱ्यांना परत
४० साक्षीदारांचे जबाब
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ४० साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून त्यातून या अपघातासाठी मोरे हाच जबाबदार असल्याचे पुढे आले असल्याचा दावा पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. मोरे हा चांगला चालक नसून त्याच्यापासून धोका आहे. त्यामुळेच, त्याला जामीन मंजूर करू नये, असेही पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला विरोध करताना म्हटले आहे.