Kurla BEST Bus Accident News : कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री बेस्ट बसने अनेक वाहनांना दिलेल्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला, तर ३६ जण जखमी झाले. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बसचालक संजय मोरेला अटक केली. दरम्यान या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ लाखांची नुकसान भरपाई घोषित केली आहे.
कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ सोमवारी रात्री १० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ही बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जात होती. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षा आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. अखेर ही बस एका भिंतीवर आदळली. या अपघातात ३० ते ३२ जण जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ सर्व जखमींना कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा आणि इतर खासगी रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा >> Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून एक्स पोस्ट करण्यात आली आहे. यात म्हटलंय की, “कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.”
“या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.”
कुर्ल्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त
ख
अपजल रसूल (१९), आझम शेख(२०), कानिफ कादरी (५५), शिवम काशिम (१८) अशी मृतांची ओळख पटली आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघातानंतर कुर्ला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी रात्रीच बसचालक संजय मोरेला ताब्यात घेतले. पोलिसांनी रात्री उशिरा त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुर्ला पश्चिम परिसरात रात्रभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय कुर्ला पश्चिम येथील बेस्ट आगारही रात्रीच बंद करण्यात आले.