प्रसाद रावकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई :  १९९७ मध्ये निवडक मुलींच्या साथीने सुरू करण्यात आलले कुल्र्यातील गोरखनाथ क्रीडा मंडळाचे महिला गोविंदा पथक यंदा रौप्य महोत्सव साजरा करत आहे. या रौप्य महोत्सवाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची जोड देत यंदा हे पथक गुजरातमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर (बीएसएफ) दहीहंडी साजरी करणार आहे. त्यासाठी १८० जणांचे एक पथक बुधवारी मुंबई सेंट्रल स्थानकातून गुजरातला रवाना झाले. 

साधारण २५-३० वर्षांपूर्वी मुंबईमध्ये लाखो रुपयांचे पारितोषिक असलेली उंच दहीहंडी फोडण्याची चुरस मुंबई-ठाण्यातील समस्त गोविंदा पथकांमध्ये लागली होती. मात्र त्या वेळी महिलांना गोविंदा पथकात स्थान नव्हते. उत्सवात केवळ बघ्याच्या भूमिकेत असलेल्या महिलांनीही मानवी थर रचून दहीहंडी फोडावी अशी कल्पना कुर्ला प्रबोधनचे सर्वेसर्वा भाऊ कोरगावकर यांनी माडली आणि १९९७ मध्ये गोरखनाथ क्रीडा मंडळाच्या पहिल्या महिला गोविंदा पथकाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावरून त्या वेळी मतमतांतरे उमटली होती. मात्र पहिल्याच वर्षी महिला गोविंदांनी यशस्वीरीत्या दहीहंडी फोडून कौतुकाची थाप मिळवली. त्यानंतर महिला गोविंदा पथकांची संख्या वाढत गेली. त्यासोबतच अधिकाधिक उंच मनोरे करण्याची जीवघेणी स्पर्धाही वाढीस लागली. त्यामुळे गोरखनाथ मित्र मंडळाचे कोरगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला गोविंदा पथकासह परराज्यातील श्रीकृष्ण मंदिरांच्या आवारात दहीहंडी फोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून द्वारका, डाकोर, उडुपी, उज्जैन आदी ठिकाणी या पथकाकडून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो.

यंदा या पथकाचे २५वे वर्ष असून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर महिला गोविंदा पथक यंदा दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत. सीमावर्ती भागातील जवानांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या संतोष परब यांच्या मुक्ता इव्हेंट अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी कंपनीची पथकाने मदत घेतली.  गोरखनाथ क्रीडा मंडळाचे महिला पथक बुधवारी मुंबई सेंट्रलवरून गुजरातला रवाना झाले.

महिला पथकाला दहीहंडी उत्सव साजरा करता यावा यासाठी महानिर्देशक, सीमा सुरक्षा बल, मुख्यालयासह विविध केंद्रीय यंत्रणा तसेच गुजरात राज्यातील सरकारी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक सहकार्य केले. त्यामुळे पहिल्या महिला गोविंदा पथकाला रौप्यमहोत्सवी दहीहंडी उत्सव जवानांबरोबर साजरा करण्याची संधी मिळाली, असे गोविंदा पथकाच्या अध्यक्ष शलाका कोरगावकर यांनी सांगितले.

दंतीवाडा, अक्षरधाममध्ये उत्सव

अहमदाबादमधील गांधीनगर येथील सीमा सुरक्षा दलाच्या सीमांत मुख्यालयात १९ ऑगस्ट रोजी सकाळी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी पथक दंतीवाडा येथे रवाना होणार आहे. तेथे जवानांच्या साक्षीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री महिला पथक दहीहंडी फोडणार आहे. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान सीमा भागातील नाराबेट येथे रवाना होऊन दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. दुपारी अक्षरधाम मंदिर परिसरात दहीहंडी उत्सव साजरा करून पथक मुंबईला रवाना होणार आहे.