कुर्ला-पुणे दरम्यान पुढील वर्षांपासून मेमू गाडी चालविण्यात येणार असून ही गाडी पनवेलपर्यंतच्या सर्व उपनगरी स्थानकांवर थांबणार आहे.
कुर्ला-पुणे हार्बरमार्गे उपनगरी गाडी चालविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनीही अशी गाडी चालविण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव उपनगरी गाडी चालविणे शक्य नसून त्याऐवजी उपनगरी गाडीप्रमाणेच असलेली ‘मेमू’ गाडी चालविण्याची तयारी असल्याचे महाव्यवस्थापकांनी बुधवारी मान्य केले. त्यासाठी रेल्वे बोर्डाकडे मेमूच्या १०० डब्यांची मागणी करण्यात आली आहे.
येत्या ६-७ महिन्यांमध्ये हे डबे उपलब्ध होतील. सध्या १२ डब्यांची मेमू चालविण्यात येणार असून आवश्यकतेनुसार ती १६ डब्यांची करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ही गाडी कुर्ला ते पनवेल मार्गावरील सर्व हार्बर स्थानकांवर थांबणार असून पुढे कर्जत, लोणावळा आणि शिवाजीनगर असा या गाडीचा प्रवास असेल. ही गाडी तीन तासात हे अंतर पार करणार आहे.

Story img Loader