लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कुर्ला आणि घाटकोपर रेल्वे स्थानकांदरम्यान सोमवारी रात्री धावत्या लोकलमध्ये प्रवाशाचा मोबाइल लंपास करणाऱ्या एका सराईत आरोपीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी रंगेहात अटक केली. आरोपीने चोरलेला मोबाइल पोलिसांनी हस्तगत केला

चकाला परिसरात वास्तव्यास असलेले विवेक हिरे (२८) सोमवारी रात्री ९ च्या सुमारास कुर्ला येथून लोकलने डोंबिवलीला जात होते. कुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वरून त्याने लोकल पकडली. त्यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. गर्दीचा गर्दीचा फायदा घेऊन चोराने विवेक हिरे याच्या पॅन्टच्या खिशातून मोबाइल काढला. ही बाब विवेकच्या लक्षात येताच त्याने तत्काळ आरडाओरडा केला.

यावेळी लोकलमध्ये साध्या वेशात कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.. त्यांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची तपासणी केली असता त्याच्याजवळ चोरलेले मोबाइल सापडले. सुजित नगरकर (३४) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.