खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

मुंबई…धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत मुलुंड, कुर्ला,अक्सा आणि अन्य ठिकाणच्या जागा नाममात्र दरात धारावी पुनर्विकास प्रकल्पास (डीआरपी) दिल्या जात आहेत. कुर्ल्यातील मदर डेअरीची काही एकर जागा धारावीसाठी देण्यास कुर्ल्यातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. हा विरोध राज्य सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी गुरुवारी सकाळपासून कुर्लावासीय रस्त्यावर उतरले आहेत. अदानीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अदानीविरोधात कुर्ल्यात आंदोलन सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून (एनएमडीपीएल) डीआरपीच्या माध्यमातून मुंबईतील अनेक ठिकाणची कित्येक एकर जागेची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. त्यात अगदी मिठागरांच्या जागेसह क्षेपणभूमीचाही समावेश आहे. डीआरपीच्या मागणीनुसार राज्य सरकारकडून जागा देण्यास सुरुवात झाली आहे. नुकतीच मुलुंडमधील ५८ एकर जागा धारावीसाठी देण्यात आली आहे. तर याआधी कुर्ल्यातील मदर डेअरीची काही एकर जागा धारावीसाठी देण्यात आली आहे. ही जागा धारावीसाठी देण्यास कुर्लावासियांचा विरोध असून त्यासाठी त्यांनी जनआंदोलन सुरु केले आहे. त्याचाच भाग म्हणून गुरुवारी सकाळी कुर्ल्यातील नेहरूनगर येथील अभ्युदय बँक येथे मोठ्या संख्येने कुर्लावासिय रस्त्यावर उतरले.

खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सध्या कुर्ल्यात जोरदार आंदोलन सुरु आहे. जी जमीन शासनाची ती जमीन अदानीची, मदर डेअरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, मुंबई अदानीला विकणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध अशा घोषणाबाजीने नेहरू नगरचा परिसरा रहिवाशांनी दणाणून सोडतला आहे. सध्या तेथे जोरदार आंदोलन सुरु असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kurla residents protest against adani opposed to giving mother dairy land to dharavi mumbai print news zws