मुंबई : बोरिवली पश्चिम परिसरातील इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून पडून २५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. मृत मजुराला कोणतेही सुरक्षा उपकरण न देता प्लम्बिंगचे काम शिकण्यासाठी १६ व्या मजल्यावर पाठवल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी इमारतीच्या कंत्राटदाराविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – मुंबई : मुलुंडमधील उद्यानातील शौचालयात सापडला महिलेचा मृतदेह
पोलिसांनी याप्रकरणी स्वतः तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, गस्तीवर असताना वझीरा नाका येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून एक व्यक्ती पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार इमारतीजवळ जाऊन पाहणी केली असता एक व्यक्ती इमारतीच्या बाजूला पडल्याचे आणि त्याच्याभोवती गर्दी जमल्याचे निदर्शनास आले. चौकशी केली असता इमारतीवरून पडलेल्या व्यक्तीचे नाव जीवन जयराम सावंत (२५) असल्याचे समजले. त्याला तत्काळ कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, सावंतला कोणतेही सुरक्षा उपकरण न देता इमारतीवर काम करण्यासाठी पाठवण्यात आले होते. याप्रकरणी कंत्राटदाराविरोधात भादंवि कलम ३०४ (अ) अंतर्गत बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.