१९५८ साली वापरात असलेली ती एक रुपयाची नोट हातात घेतल्यानंतर मिल्खा सिंग भावुक झाले होते. हा तोच काळ होता जेव्हा त्यांनी स्वतंत्र भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. आज त्याच १९५८ सालची आठवण त्यांना निर्माता-दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी करून दिली. ‘फ्लाइंग सीख’ या नावाने ओळखले जाणारे भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांच्या आयुष्यावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटासाठी मानधन म्हणून मिल्खा यांनी मेहरांक डून फक्त एक रुपया घेतला. मेहरांनीही हा एक रुपया देताना १९५८ सालची एक रुपयाची नोट शोधून ती त्यांना भेट म्हणून दिली.
राकेश मेहरा सध्या ‘भाग मिल्खा भाग’च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटात मिल्खा सिंग यांची भूमिका फरहान अख्तर करतो आहे. आपल्या आयुष्यावर चित्रपट बनणार हे कळल्यानंतर आनंदित झालेल्या मिल्खा सिंग यांनी मेहरांकडे कोणत्याही प्रकारे मानधनाची मागणी केली नाही. उलट, आपल्यावर चित्रपट येतोय याचाच त्यांना जास्त आनंद झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना खेळामध्ये प्रावीण्य मिळविण्याची आणि देशाला सुवर्णपदक जिंकून देण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे, अशी इच्छा त्यांनी मेहरांकडे व्यक्त केली.
मिल्खा सिंग यांच्या विनम्र स्वभावाने चकित झालेल्या राकेश मेहरांनाही आपण मिल्खा यांना लक्षात राहील असे काही तरी भेट दिले पाहिजे, असे वाटले. म्हणूनच त्यांच्या पहिल्या सुवर्णपदकाची आठवण करून देणाऱ्या १९५८ मधील एक रुपयाची नोट त्यांनी शोधून काढली आणि ती मिल्खा सिंग यांना भेट देण्यात आली. मिल्खा सिंग यांनीही एक रुपयाची ही नोट आपल्यासाठी अमूल्य भेट असल्याचे म्हटले आहे.