अंधेरीच्या जे. बी. नगर येथील ‘श्री गौरीशंकर केडिया इंग्लिश स्कूल’ शाळेत वीज नसल्याने गेल्या बुधवारपासून संपूर्ण शाळाच बंद आहे. गेल्या बुधवारी शाळेच्या गच्चीवरील वर्गामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. मात्र, हे शॉर्टसर्किट शाळेने अनधिकृतपणे केलेल्या बांधकामाच्या ठिकाणी झाल्याची चर्चा आहे.
वीज नसल्याने वर्गात अंधार असतो. परिणामी शिकविता येत नाही म्हणून शिक्षक वर्गच घेत नाहीत. आता वर्ग होत नाहीत म्हणून मुलेच शाळेत येईनाशी झाली आहेत. या गोंधळात शाळेचे सगळे कामकाजच ठप्प आहे. या सगळ्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मात्र विनाकारण शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांमध्ये नाराजीची भावना आहे.
अंधेरी पूर्वेला कोहिनूर इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलसमोर असलेल्या या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जवळच्या मरोळ पाइपलाइन परिसरातील बहुतांश मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिकतात. पण, वीज नाही म्हणून गेले आठवडाभर या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.
ही शाळा तशी दोन मजलीच आहे. पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंतची साधारणपणे हजार एक मुले या शाळेत शिकतात. परंतु, गच्चीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने गेल्या आठवडय़ात बुधवारी शाळेची वीज गेली. तेव्हापासून बंद झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात शाळेच्या प्रशासनाला आजतागायत यश आलेले नाही. परिणामी शाळा बंद ठेवावी लागते आहे. इतके दिवस होऊनही वीजपुरवठा सुरू करण्यात शाळेला यश न आल्याने आता पालकही नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
‘इतके दिवस होऊनही शाळेला साधा वीजपुरवठा पूर्ववत करता आलेला नाही. वर्ग होत नसल्याने आमची मुले घरीच आहेत. आता नाताळची सुट्टी सुरू होईल. त्यात पुन्हा आठ-दहा दिवस त्यांचा अभ्यास बुडेल त्याचे काय,’ असा सवाल एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर केला. या भागातील सामाजिक कार्यकर्ते अजिज उमरेलीवाला यांनी शाळेने अनधिकृतपणे बांधकाम केल्याची तक्रार पालिकेकडे केली होती. या अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणीच शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा बंद झाल्याची चर्चा आहे. मात्र, ‘आपण शाळेने केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रारी करूनही त्याला पालिका प्रशासनाने दाद दिली नाही. या प्रकारच्या बांधकामांना अभय देणे म्हणजे हजारो विद्यार्थी, शिक्षकांच्या जीवाशी खेळणे आहे. त्यामुळे, पालिकेने तातडीने शाळेने केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी,’ अशी मागणी उमरेलीवाला यांनी केली. या संबंधात शाळेच्या दूरध्वनी क्रमांकावर दिवसभर प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळू न शकल्याने शाळेची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
शिक्षणाचा खेळखंडोबा
जे. बी. नगर येथील ‘श्री गौरीशंकर केडिया इंग्लिश स्कूल’ शाळेत वीज नसल्याने संपूर्ण शाळाच बंद आहे.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
First published on: 08-12-2015 at 08:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of basic facilities in schools