‘त्या’ वेळची खबरसुद्धा गुप्तचर यंत्रणेचीच होती. मात्र ती महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला पुरविण्याऐवजी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाला देण्यात आली. परिणामी श्रेय लाटण्याच्या नादात देशातील तब्बल ५०हून अधिक बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग असल्याचा आरोप असलेला यासिन भटकळ हाती लागण्याआधीच निसटला. अन्यथा तो दीड वर्षांपूर्वीच भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात आला असता.
यासिनचा इंडियन मुजाहिदीनशी संबंधित प्रत्येक घातपाताशी छोटे संबंध असल्याचे महाराष्ट्र ‘एटीएस’च्या त्यासाठी वेळोवेळी निष्पन्न होत होते. यासिनबाबत बरीचशी माहिती एटीएसला मिळत होती. या माहितीनंतर एटीएसचे पथक अगदी नेपाळच्या सीमेपर्यंत जाऊन आले. पण तो हाती लागला नाही. त्या काळात यासिन मुंबईत घातपात घडविण्यात गुंतला होता. एटीएसचे वरिष्ठ अधिकारी यासिनचा ठावठिकाणा मिळावा, यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते.
१३ जुल २०११ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांची आखणी भायखळ्यातील हबीब अपार्टमेण्टमध्ये यासिनच्या उपस्थितीत झाली. वक्कास आणि तबरेज या दोन पाकिस्तानी नागरिकांसमवेत यासिनने प्रत्यक्ष हजर राहून घटनास्थळाची पाहणीही केली. महाराष्ट्र एटीएसचे पथक याच माहितीच्या अनुषंगाने बिहापर्यंत पोहोचले होते. दरभंगा जिल्ह्य़ात त्यांना यासिन जवळपास सापडला होता. पण तो यासिन नव्हता तर नकी होता. दिल्लीहून यासिन समजून नकीचा पाठलाग केला गेला. नकी याला दिल्ली पोलिसांतील शिपायाच्या ताब्यातून घेऊन मुंबई बॉम्बस्फोटांप्रकरणी अटक करण्यात आली. पण आयबीच्या सांगण्यावरून नकी मुंबईत चालला होता. भायखळ्याच्या हबीब अपार्टमेंटमध्ये त्याला यासिन भेटणार होता. नकीमार्फत आयबीने गुप्त मोहीम आखली होती. मात्र महाराष्ट्र एटीएसला विश्वासात न घेतले गेल्याने नकीला एटीएसने जेरबंद केले आणि गुप्तचर यंत्रणेची यासिन मोहीम फसली.
गुप्तचर यंत्रणेला ही खबर महाराष्ट्र एटीएसच्या हाती पडू द्यायची नव्हती. आयपीएस अधिकारीवर्गातील अंतर्गत असुयेचा तो मामला होता. त्यामुळेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यापर्यंत ती खबर पोहोचविण्यात आली. हा अधिकारी आपला लवाजमा घेऊन साध्या वेशात हजर होता. पण महाराष्ट्र एटीसच्या ताब्यात नकी गेला अन् यासिन सावध होऊन गायब झाला. वास्तविक यासिन तेथे भाडय़ाच्या खोलीपोटी दिलेली अनामत रक्कम घेण्यासाठी जाणार होता. परंतु ऑपरेशन होण्याआधीच यासिन सावध झाला. त्यानंतर पुण्यातील स्फोटाशीही यासिन जोडला गेला. २०१२ मध्ये यासिनचा शोध घेणाऱ्या एटीएसला आयबीने विश्वासात घेतले असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते.
समन्वयाच्या अभावामुळे सुरक्षा यंत्रणांच्या हाती अपयश
‘त्या’ वेळची खबरसुद्धा गुप्तचर यंत्रणेचीच होती. मात्र ती महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला पुरविण्याऐवजी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाला देण्यात आली.
First published on: 30-08-2013 at 02:09 IST
TOPICSयासिन भटकळ
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of coordination cause yasin bhatkal arrest plan fail