१६०० विद्यार्थ्यांचे हाल; पालक त्रस्त, उपस्थिती रोडावली
दुष्काळाच्या झळांनी महाराष्ट्रातील गावे तहानलेली असताना मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे. पण मुंबईकरांना पुरेसा पाणीपुरवठा होत असताना मुंबईतील पालिकेच्याच एका शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र गेला महिनाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नैसर्गिक विधीसाठी विद्यार्थ्यांना शाळेबाहेरील सार्वजनिक प्रसाधनगृहात धाव घ्यावी लागत आहे. शाळेत पाणीच येत नसल्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. परिणामी, शाळेतील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती वाढू लागली आहे.
जोगेश्वरीच्या टेलिफोन एक्स्चेंजजवळील ओशिवारा मनपा शाळा संकुलात उर्दू, मराठी आणि हिंदी माध्यमाच्या प्रत्येकी दोन शाळा आणि एक हायस्कूल असून या शाळांमध्ये तब्बल १६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत धोकादायक बनली असून त्याची डागडुजी सुरू आहे. या शाळेतील दोन नळजोडण्यांपैकी एक काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आली. एक नळजोडणी सुरू असून त्यातून कधीतरीच पाणीपुरवठा होतो. गेल्या महिनाभरात केवळ चार-पाच दिवस पाणी आले.
शाळेमध्ये पाणी साठविण्यासाठी सिमेंट काँक्रीटच्या आणि प्लास्टिकच्या मोठय़ा टाक्या उपलब्ध आहेत. मात्र त्यातून पाण्याची गळती होत असल्याने शाळेची मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे पाणी साठवून ठेवण्यासाठी शाळेनेच पिंप खरेदी केले. पण पाणीच येत नसल्यामुळे पिंप कोरडी पडली आहेत. या शाळेत एक कूपनलिकाही आहे. पण त्यावर बसविलेला पंप नादुरुस्त झाल्याने कूपनलिका बंदच आहे. शाळेच्या आसपासच्या झोपडपट्टीत बसविण्यात आलेल्या पंपांमुळे शाळेला पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार आहे.
गेल्या महिनाभरात केवळ चार-पाच दिवस वगळता शाळेला पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार पालिकेच्या जलविभागाकडे करण्यात आली. परंतु केवळ पाहणी करण्यापलीकडे जल विभागातील अधिकाऱ्यांनी काहीच केले नाही. शाळेचे प्रवेशद्वार लहान असल्यामुळे पाण्याचा टँकर माघारी गेला. त्यामुळे शाळेने लहान टँकर उपलब्ध केल्यास पाणी उपलब्ध करू असे उत्तर देत जल विभागातील अधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाची बोळवण केली. विद्यार्थ्यांनी पिण्यासाठी पाण्याची बाटली आणावी. पाण्याअभावी नैसर्गिक विधीसाठी विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे सोबत आणखी दोन-तीन बाटल्या पाणी भरून आणावे, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे. एकीकडे पाठीवरच्या दप्तराचे ओझे हलके करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असताना आता पाण्याच्या बाटल्यांचे ओझे या शाळेतील विद्यार्थ्यांना वाहावे लागत आहे. नैसर्गिक विधीसाठी विद्यार्थ्यांना शाळेजवळील प्रार्थनास्थळात अथवा सार्वजनिक शौचालयामध्ये धाव घ्यावी लागते. पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले असून पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याने उपस्थिती रोडावली आहे.

शाळेत महिनाभर पाणीपुरवठा होत नसून त्याची चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करायला हवी.
– शिवनाथ दराडे, शिक्षण समिती सदस्य

Story img Loader