आत्मनियंत्रण कमी करणाऱ्या अमली पदार्थाचा सुळसुळाट
तरुणींना गुंगी आणण्यासाठी शीतपेय किंवा मद्यातून दिल्या जाणाऱ्या ‘डेट रेप’सारख्या अमली पदार्थाचा सुळसुळाट नवीन वर्षांनिमित्त होणाऱ्या पाटर्य़ामध्ये गेल्या वर्षीपासून वाढला आहे. मेंदूवरच ताबा घेणाऱ्या या पदार्थामुळे तरुणी लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरतात. गेल्या वर्षी या प्रकारची दोन प्रकरणे जेजे रुग्णालयात आली होती. त्याला अनुसरूनच तरुणींना या प्रकारच्या पदार्थापासून सावध राहावे, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
नवीन वर्षांच्या पाटर्य़ानिमित्त या पदार्थाची परदेशातून मोठय़ा प्रमाणात आयात केली जाते. पेयात मिसळून दिले जाणारे हे अमली पदार्थ थेट मेंदूवर परिणाम करतात. या अमली पदार्थाच्या सेवनानंतरच्या ८ ते १२ तासांच्या काळात महिलांवर बलात्कार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी जे. जे. रुग्णालयातील मनोविकारतज्ज्ञ विभागात या अमली पदार्थाच्या बळी ठरलेल्या दोन तरुणी उपचारासाठी आल्या होत्या. पार्टीच्या दुसऱ्या दिवशी त्यांना जाग आली, तेव्हा त्या एका हॉटेलच्या खोलीत होत्या. शरीरावरील काही खुणांवरून आपल्यावर बलात्कार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु, आदल्या रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांना काहीच आठवत नव्हते. या मानसिक धक्क्यातून सावरण्याकरिता त्यांना उपचारासाठी म्हणून जे. जे. रुग्णालयाच्या मनोविकारतज्ज्ञ विभागात आणण्यात आले होते.
‘डेटरेप’ काय आहे?
सध्या बाजारात रोहिप्नोल, जीएचबी (गामा हायड्रोक्सिीबट्रिक अॅसिड) आणि किटामिन या ‘डेट रेप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमली पदार्थाचे अनेक प्रकार आले आहेत.
रोहिप्नॉलला ‘रुफी’ आणि किटामिनला ‘स्पेशल के’ या नावाने ओळखले जाते. रोहिप्नोल छोटय़ा गोळ्यांच्या स्वरूपात असतो. तर जीएचबी द्रव्य स्वरूपात आणि किटामिन पावडर स्वरूपात असतात.
कुठल्याही पेयांमध्ये घालून हे अमली पदार्थ दिले जातात. याच्या सेवनानंतर १५ मिनिटांत त्याचा प्रभाव सुरू होतो. साधारण याचा परिणाम ८ ते १२ तास राहतो.
या दरम्यान घडलेल्या घटना त्या व्यक्तीच्या स्मरणात राहत नाही. कारण हे पदार्थ मेंदूच्या स्मृतिकेंद्रावर परिणाम करतात. या पदार्थाच्या अमलाखालील व्यक्ती दिलेल्या सूचनांनुसार काम करते.
शरीरातील स्नायू शिथिल होतात आणि शारीरिक विरोध करता येत नाही, असे किंग एडवर्ड मेमोरिअल रुग्णालयातील (केईएम) मनोविकार विभागातील डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.
पार्टीला जाताना..
* अनोळखी व्यक्तीकडून शीतपेय किंवा कुठल्याही प्रकारचे पेय स्वीकारू नये.
* आपले पेय कायम सोबत ठेवा.
* शक्यतो बाटलीबंद पाणी किंवा पेय प्यावे.
* पेय पिताना वेगळी चव आढळली तर मदतीसाठी मित्रमैत्रिणींशी संपर्क साधा
अतिसेवन आरोग्याला घातक
हे अमली पदार्थ रक्त किंवा लघवीच्या तपासणीत दिसून येत नाहीत. मात्र, याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास मृत्यूही ओढवू शकतो. अमली पदार्थाच्या परिणामांमुळे व्यक्ती बेशुद्ध होत नाही. पण अलिप्त स्थितीत जातो. त्याच्या संवेदना जागृत असतात. अशा वेळी महिलेच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवले असल्याचे भासवले जाऊ शकते. परंतु, महिलांनी या पदार्थाच्या अमलाखाली लैंगिक छळ झाल्यास पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक आहे, असे मनोविकारतज्ज्ञ डॉ. वाणी कुल्हाळी यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हे पदार्थ औषधांच्या दुकानात विकले जात असतील तर अशा दुकानांवर कारवाई करण्यात येईल. अवैधरीत्या अशा अमली पदार्थाची विक्री केली जात असेल तर १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क करावा. यावर तातडीने कारवाई करण्यात येईल.
– डॉ. हर्षदीप कांबळे, अन्न व औषधे प्रशासन, आयुक्त