हाजी अली उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या आयकर आयुक्त टी. के. शहा यांच्या गाडीने शनिवारी रात्री दोन टँक्सींना धडक दिली. त्यात दोन महिला जखमी झाल्या. तर भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलची धडक बसून गिरगाव चौपाटी येथे टॅक्सीचालकाला जखमी केले.
वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १० च्या सुमारास हाजी अली उड्डाणपुलावरुन मुंबईचे मुख्य आयकर आयुक्त टी. के. शहा यांची अ‍ॅम्बेसेडर गाडी विरूद्ध दिशेने जात होती. या पुलावरुन गाडी नेण्यास मनाई असतानाही शहा यांच्या चालकाने पूलावरून गाडी नेली. त्यावेळी या गाडीने समोरून येणाऱ्या दोन टॅक्सींना धडक दिली. त्या धडकेत दोन महिला जखमी झाल्या. पोद्दार रुग्णालयात उपचार करून या महिलांना घरी सोडण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गाडीचा चालक ज्ञानेश्वर शिंदे याला अटक करुन नंतर त्याची जामिनावर सुटका केली. या अपघातात शहा यांना दुखापत झाली नसल्याचे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पवार यांनी सांगितले. दरम्यान, गिरगाव येथे भरधाव वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्या दोन तरुणांच्या धडकेत एक टॅक्सीचालक जखमी झाला. गिरगाव चौपाटीजवळील आयडीयल जंक्शनसमोर शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

Story img Loader