मुंबई : राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलै मध्ये लागू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील निकषांचे उल्लंघन करणाऱ्या पाच लाख बहिणींना महिला विकास विभागाने अपात्र ठरविले आहे. ही संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. चारचाकी ‘गाडीवाल्या’ लाडक्या बहिणींची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात असून आर्थिकदृष्टया सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अपात्र बहिणींची संख्या जास्त ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

योजनेतील बहिणींच्या अर्जाच्या छाननीने स्थानिक पातळीवर वेग घेतला आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांचे आवाहन आणि शासकीय कारवाईच्या भितीने आतापर्यंत दीड लाख लाडक्या बहीणींनी ‘योजना नको’ म्हणून अर्ज केले आहेत. ही संख्या राज्यात दहा लाखापर्यंत जाण्याची शक्यता महिला विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत.

छाननी न करता दाखल करण्यात आलेल्या अर्जात वयोमर्यादा (२१ ते ६५) पार केलेल्या किंवा २१ वयापेक्षा कमी असलेल्या एक लाख दहा हजार अपात्र लाडक्या बहीणी आहेत. ही सरासरी महिन्याला एक लाख राहण्याची शक्यता आहे. समोर आलेली ही संख्या पुणे व आजूबाजूच्या जिल्हयातील आहे. चार चाकी वाहन असलेल्या ‘गाडीवाल्या’ लाडक्या बहिणींची संख्या एक लाख ६० हजार असून ही संख्या केवळ पश्चिम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या कुटुंबाची आहे. अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींची अद्याप छाननी सुरू झालेली नाही.

प्राप्तिकर विभागाच्या यादीची प्रतीक्षा

● राज्य सरकारकडून शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थींची यादी महिला विकास विभागाला तात्काळ मिळाल्याने या योजनेचा लाभ घेतलेल्या दोन लाख ३० हजार बहिणींना अपात्र ठरविणे सहज शक्य झाले.

● शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ९४ लाखाच्या घरात आहे. परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातील बहिणींनी यापुढे योजनेतील लाभ स्विकारण्यास नकार दिला आहे.

● मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातील छाननीची ही संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. प्राप्तिकर विभागाकडून माहिती आल्यानंतर ही छाननी अधिक तीव्र होणार असून ही गळती लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladki bahin yojana ineligible womens more in western maharashtra css