मुंबई: गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हाडाकडे जमा झालेल्या १ लाख ५० हजार ४८४ अर्जदारांच्या अर्जांची छाननी करत पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत अंदाजे ५३ हजार कामगारांनी कागदपत्रे जमा केली असून अजूनही लाखभर कामगारांकडून कागदपत्रे जमा करून घेणे बाकी आहे. म्हाडाने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने कागदपत्रे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर ऑनलाईन पद्धतीने हि प्रक्रिया पार करणे कामगारांसाठी सर्व दृष्टीने सोयीस्कर असताना कामगार ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. त्यामुळे कामगारांनी ऑनलाईन कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन म्हाडाकडून करण्यात येत आहे.
सोडतीआधीच कामगारांची पात्रता निश्चिती करण्याची मागणी काही कामगार संघटनांची होती. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाने १ लाख ५० हजार ४८४ कामगारांच्या अर्जांची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासाठी कामगारांकडून कागदपत्रे जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करता येत असताना अनेक कामगार ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळेच वांद्रे येथील समाज मंदिर सभागृह या ऑफलाईन केंद्रावर कामगार मोठया संख्येने गर्दी करत आहेत.
हेही वाचा… बनावट औषधांना आळा घालण्यासाठी परराज्यातील औषध खरेदीवर एफडीएचे लक्ष
अगदी सकाळी सहा वाजताच या केंद्रावर रांगा लावताना दिसत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कामगार वा त्यांचे वारस येथे पोहचत आहेत. ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करण्याची सुविधा असताना विविध गावातून कामगार गाडीखर्च करून मुंबईत येत आहेत. तेव्हा कामगार आणि त्यांच्या व वारसांनी मुंबईत न येता ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन मुंबई मंडळाने केले आहे. दरम्यान मुंबई मंडळाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने ४३, २०० तर ऑफलाईन पद्धतीने ९७४१ अशा अंदाजे ५३ हजार अर्जदारांनी कागदपत्रे जमा केली आहेत. त्यामुळे अजूनही एक लाखांच्या आसपास अर्जदारांकडून कागदपत्रे जमा करून घेण्याचे मोठे आव्हान मुंबई मंडळासमोर आहे.