भारतीय स्वातंत्र्य लढय़ात आपल्या प्राणांची आहुती देणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे कुटुंबीय आणि साडेसातशे वर्षांपूर्वी पंजाब येथे दीर्घकाळ वास्तव्य करून तेथे सामाजिक, धार्मिक ऐक्याची मुहूर्तमेढ रोवणारे संत नामदेव यांचेही वंशज घुमान साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. तसेच देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या ‘लाल, बाल आणि पाल’ यांच्या कुटुंबीयांनाही घुमान साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
भगतसिंग यांचे पुतणे किरणजित सिंग, सुखदेव यांचे पुतणे अनुज थापर, राजगुरू यांचे वंशज सत्त्वशील कमलाकर राजगुरू यांनी संमेलनास उपस्थित राहणार असल्याचे संमेलन संयोजकांना कळविले आहे. संत नामदेव यांचे वंशज नामदास महाराज यांनाही संमेलनास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले असून तेही उपस्थित राहणार आहेत. तसेच पंजाब येथे राज्यपाल म्हणून काही काळ काम केलेले दिवंगत नरहर विष्णू ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे नातू अनंत गाडगीळ हेही संमेलनास येणार आहेत. स्वातंत्र्यलढय़ातील ‘लाल, बाल, पाल’ अर्थात लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि अन्य कारणाने ज्या ज्या व्यक्तींचा पंजाबशी संबंध आला आणि ज्यांचे ऋणानुबंध पंजाबशी जोडले गेले आहेत अशा मंडळीच्या कुटुंबीयांना घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनास आम्ही अगत्याने आणि आवर्जून बोलाविले असल्याची माहिती संमेलन आयोजक ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
संमेलनाचे टपाल तिकीट
पुणे : संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथील ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली असून पाच रुपयांचे सर्वागसुंदर टपाल प्रकाशित केले आहे. संमेलनाला अवघे तीन दिवस उरले असताना महत्त्वाची राष्ट्रीय घटना म्हणून संमेलनाच्या बोधचिन्हासह रंगीत तिकीट उपलब्ध करून दिले आहे.
‘नाचू कीर्तनाचे रंगी’ म्हणत हाती एकतारी आणि चिपळ्या घेतलेली संत नामदेवांची तल्लीन मुद्रा, खुला ग्रंथ आणि मोरपिसाची लेखणी, असे या संमेलनाचे बोधचिन्ह असलेल्या तिकिटावर पिवळ्या रंगातील लिलीची फुले असल्यामुळे या तिकिटाचे सौंदर्य खुलले आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा हा योग प्रथमच येत असल्याने साहित्यिकांसह मराठी माणसांना अभिमान वाटावी, अशी गोष्ट असल्यामुळे या टपाल तिकिटाविषयी नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्यासह सर्वानी आनंद व्यक्त केला जात आहे.
शेखर जोशी, मुंबई
संत नामदेवांचे वंशजही घुमानला
भारतीय स्वातंत्र्य लढय़ात आपल्या प्राणांची आहुती देणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे कुटुंबीय आणि साडेसातशे वर्षांपूर्वी पंजाब येथे दीर्घकाळ वास्तव्य करून तेथे सामाजिक,
First published on: 01-04-2015 at 02:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lal bal and pal family get invitation of marathi sahitya sammelan