मंडपासाठी केलेले खड्डे बुजवले नसल्याने महानगरपालिकेने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला तब्बल २३ लाख ५२ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. यावर्षी मंडपाला परवानगी देण्यात आली असली तरी मालमत्ता करातून दंड वसूल केला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी संबंधित मंडळांना पालिकेच्या प्रभाग कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते. मंडप उभारण्यासाठी तसेच इतर कामांसाठी रस्त्यावर केलेले खड्डे बुजवण्याची जबाबदारी मंडळांची असते. लालबागच्या राजाच्या मंडळाने परिसरात तब्बल ९५६ खड्डे खणले होते. प्रत्येक खड्डय़ासाठी दोन हजार रुपयांचा दंड म्हणून पालिकेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या मंडळाला २३ लाख ५२ हजार रुपयांचा दंड ठोठावला. मात्र मंडळाने तो भरला नाही. त्यामुळे यावर्षी मंडपाची परवानगी घेण्यास आलेल्या मंडळाला प्रभाग कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली नाही. मात्र हे खड्डे मंडळाने केलेच नसल्याचा दावा मंडळाकडून करण्यात आला.
‘लालबागच्या राजाच्या मंडळाला मंडप उभारण्यासाठी यावर्षी परवानगी देण्यात आली आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये मंडळाला केलेला दंड वसूल केला जाईल. मंडळाच्या अनेक ठिकाणी मालमत्ता असून तेथील मालमत्ता करातून पालिका दंडाची रक्कम वसूल करेल,’ असे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी सांगितले.

Story img Loader