अयोध्येत रामलल्लांच्या अभिषेकासाठी अवघे काही तास उरले आहेत. २२ जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे. श्री रामजन्मभूमी ट्रस्टने या सोहळ्यासाठी देश-विदेशातल्या दिग्गजांना निमंत्रणं पाठवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत या तिघांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मंदिर समितीने केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मोठे नेते, राम मंदिरासाठी आंदोलन करणारे कारसेवक, खेळाडू, कलाकार आणि साधू-संतांसह तब्बल ७,००० हून अधिक लोकांना या उत्सवाचं निमंत्रण पाठवलं आहे. त्याचबरोबर मुंबईतल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे.
लालबागचा राजा गणोशोत्सव मंडळाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून या निमंत्रणाबाबतची माहिती दिली आहे. त्याचबरोबर मंडळाचे पदाधिकारी या सोहळ्यासाठी अयोध्येला रवाना झाले आहेत. मंडळाने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, लालबागच्या राजाला अयोध्येतून बोलावणं आलं आहे. अयोध्येतील श्रीरामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (२२ जानेवारी) होणार आहे. याचे विशेष निमंत्रण लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आलं आहे. मंडळाचे अध्यक्ष या सोहळ्यासाठी अयोध्येला रवाना झाले आहेत.
मंडळाने म्हटलं आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक रवींद्र संघवी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी आणि खजिनदार मंगेश दळवी यांची लालबाग येथील मंडळाच्या कार्यालयात भेट घेतली आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. हा क्षण सर्वांसाठी मोलाचा आणि आनंदाचा आहे. प्राणप्रतिष्ठा उत्सव समितीने यात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सहभागी करून घेतलं आहे याचा आनंद आहे. मंडळाचे अध्यक्ष या निमंत्रणाचा सन्मान राखत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्याकडे रवाना झाले आहेत.
हे ही वाचा >> “आम्ही आज अयोध्येला जाणार होतो, पण…”, अजित पवारांनी सांगितलं प्राणप्रतिष्ठेला न जाण्याचं कारण
निमंत्रण पत्रिकेत लिहिलं आहे की, “२२ जानेवारी रोजी अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल. तुम्हीही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी (सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान) तुमच्या गावात, परिसर, कॉलनीतील कोणत्याही मंदिराच्या आसपासच्या भागातील रामभक्तांना एकत्र करून भजन-कीर्तन करावे आणि दूरदर्शन किंवा कोणतीही स्क्रीन वापरून (एल. ई. डी. पडदे लावून) अयोध्येचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सर्वांना दाखवा. शंखनाद करावा, घंटा वाजवा, आरती करा आणि प्रसाद वाटा.”