‘आयपीएल’चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी आपल्या संकेतस्थळावर सोमवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या अनेक कागदपत्रांमध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र मोदी यांच्यात २००९ मध्ये बोलणी केल्याची माहिती उघड केली आहे. प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये फेब्रुवारी व मार्च २०१० मध्ये केलेल्या ललित यांच्या दूरध्वनींच्या बिलांचा समावेश आहे. यात अमित शहा यांना तीन मिनिटांचा कॉल केल्याचाही समावेश आहे. चौथ्या हंगामासाठी दोन नवीन संघांचा समावेश करण्याच्या मुद्दय़ावर बोलणी करण्यासाठी ही बैठक झाली होती.  त्यामुळे आता परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यापाठोपाठ भाजपमधील शक्तिशाली  मोदी-शहा ही जोडगळी वादात सापडण्याची शक्यता आहे.
ललित मोदी यांनी त्यांच्या संकेतस्थळाबरोबरच ट्विटच्या माध्यमातूनही आणखी काही गौफ्यस्फोट केले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींचे सचिव पॉल यांच्यावरदेखील काही गंभीर आरोप केले आहेत. ‘पॉल’, ‘बॅगमॅन’, ‘ओमिटा’, ‘विवेक’, ‘नागपाल’ या वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी व्यक्ती हवाला रॅकेटची सर्वात मोठी सूत्रधार आहे. याविषयी इतरांना बरीच माहिती आहे. मग त्यांची चौकशी का केली जात नाही. सर्वोच्च पदावरील व्यक्तींशी त्यांची जवळीक असल्यामुळेच असे केले जात आहे का, असा सवाल ललित मोदींनी आपल्या ट्विटसमध्ये उपस्थित केला आहे.

Story img Loader