मुंबई: अंमलीपदार्थ निर्मिती करणारा मुख्य आरोपी ललित पाटीलचा चालक सचिन वाघ याने नाशिकमध्ये मेफ्रेडॉनची विल्हेवाट लावली असून ते शोधण्यासाठी साकीनाका पोलिसांचे पथक नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. आरोपी सचिन वाघने मोठय़ा प्रमाणात एमडी साठय़ाची विल्हेवाट लावली. वाघने ललित पाटीलच्या सांगण्यावरून तसे केल्याचे चौकशीत सांगितले. आरोपीने नाशिकमधील गिरणा नदी पात्रात अंमलीपदार्थ फेकल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले. त्यामुळे मुंबई पोलिसांचे पथक पाणबुडय़ांच्या मदतीने नदीत अंमलीपदार्थाचा शोध घेत आहे. त्यासाठी सोमवारपासूनच पोलिसांचे एक पथक नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. याप्रकरणी ललित पाटील व भूषण पाटील यांची एकमेकांसमोर चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी भूषण पाटीलचाही लवकरच ताबा घेण्यात येणार आहे. हा सर्व प्रकार ललित पाटीलच्या सांगण्यावरून चालू होता, अशी माहितीही तपासात उघड झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील ‘एमटीएनएल’ सेवा ठप्प; कंत्राटाचे नूतनीकरण वेळेत न झाल्याचा फटका

 याप्रकरणी साकीनाका पोलिसांच्या ताब्यात ललित पाटीलसह चार आरोपी आहे. सर्व आरोपी २७ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहेत. याप्रकरणी आतापर्यंत १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ललित पाटील पुण्यातील रुग्णालयातून पलायन केल्यानंतर चालक सचिन वाघच्या संपर्कात होता. त्यावेळीच त्याने एमडीची विल्हेवाट लावण्यास सांगितल्याचा आरोप आहे. पुण्यातून पळून गेल्यानंतर ललित प्रथम चाळीसगावला गेला होता. तेथून धुळय़ाला जाऊन त्याने भाडेतत्त्वाने वाहन घेतले. त्या वाहनाद्वारे तो गुजरातमधील सुरतजवळील एका ठिकाणी पोहोचला. पाटील यांचे गुजरातमध्ये काही नातेवाईक आहेत. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांची मदत घेतली आणि नंतर मोटरगाडीने सुरत-सोलापूर-विजापूर मार्गे कर्नाटक गाठले. विजापूरनंतर ते बंगलोर शहर आणि बंगलोर ग्रामीण दरम्यान असलेल्या चन्नासंद्रा गावात गेला.  पाटील याचा शोध घेत असताना पोलिसांचे पथक त्याच्या जवळच्या नातेवाईकांवर लक्ष ठेवून होते. त्यात पाटील याने सुरतमधील त्यांच्या एका नातेवाईकाशी संपर्क साधला आणि भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी या नातेवाइकाचा माग काढला आणि पाटील सुरत-सोलापूर-विजापूर मार्गे भाडय़ाच्या वाहनाने कर्नाटकला निघाल्याचे समजले.अखेर चन्नासंद्रा येथील एका हॉटेलमध्ये पाटीलचा माग काढण्यात पोलिसांना यश आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalit patil case driver sachin wagh throw md drug packets in girna river in nashik zws