बीड जिल्ह्यातील पोलीस शिपाई ललिता साळवे यांची लिंगबदल शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आज (१२ जून २०१८) त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता ललिता साळवेची ओळख ‘ललित’ अशी असणार आहे.
बीडमधून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१० मध्ये साळवे महाराष्ट्र पोलीस दलात महिला शिपाई म्हणून रुजू झाल्या. साळवे जन्मत:च मुलगा म्हणून जन्माला आले होते. मात्र त्यांची जननेंद्रिये विकसित न झाल्याने स्त्रीप्रमाणे ते भासत होते. त्यामुळे घरामध्ये मुलगी समजूनच त्यांना वाढविण्यात आले. साळवेंची लहानपणापासून मुलगी म्हणून वाढ झाली असली तरी त्यांच्यामध्ये मुलाचे हार्मोन्स असल्याने वयात आल्यानंतर त्यांना आपण मुलगी नसून मुलगा आहोत, असे वाटत होते.
अखेर वर्षभरापूर्वी त्यांनी पोलीस खात्याकडे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी मागितली होती. महिला असून पुरुष असल्याचा त्यांच्या या अजब दाव्यामुळे त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांचा लढा सुरू होता. अखेर त्यांना या लढ्यात यश आलं असून ‘ललित साळवे अशी नवी ओळख त्यांना मिळाली आहे. गेल्यामहिन्यात लिंग बदल शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला. आता ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वाचा : काय आहे लिंगबदल शस्त्रक्रिया?
सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर व त्यांच्या चमूने टप्प्या टप्प्यानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये अशी शस्त्रक्रिया प्रथमच झाली.