सुशांत मोरे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी कुर्ला – परळदरम्यान उभारण्यात येणाऱ्या पाचवा-सहाव्या मार्गिकतील भूसंपादनाचा अडथळा दूर झाला असून येत्या चार – पाच महिन्यांमध्ये भूसंपादन पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. त्यामुळे परेलपर्यंत लवकरच नवी मार्गिका उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई: गिरणी कामगारांप्रमाणे `बेस्टʼ कामगारांनाही मालकीची घरे हवीत!

मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून लोकलचे वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी कल्याण – सीएसएमटीदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका उभारण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेने घेतला होता. त्यानुसार कल्याण – दिवा आणि ठाणे – कुर्ल्यादरम्यान पाचवी – सहावी मार्गिका उभारण्यात आली. मात्र ठाणे – दिव्यादरम्यान पाचवी – सहावी मार्गिका उभारण्याचे काम गेल्या १० वर्षांहून अधिक काळ रखडले होते. या मार्गिकेच्या कामाला अनेक वेळा अंतिम मुदत देण्यात आली. अखेर फेब्रुवारी २०२२ मध्ये या मार्गिकेचे काम पूर्ण करून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. मध्य रेल्वेने कुर्ल्यापर्यंतच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम परेल स्थानकापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी भूसंपादनही करण्यात येत आहे. कुर्ला – परेलदरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी १० हजार १३९ चौरस मीटर जागा लागणार असून यापैकी पाच हजार ७५१ चौरस मीटर जागा संपादित करण्यात आली आहे. सुमारे ५७ टक्के भूसंपादन झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. उर्वरित भूसंपादन चार ते पाच महिन्यात पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर या मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात कण्यात येईल आणि हे काम किमान दोन – अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल. काम पूर्ण होताच परेलपर्यंत मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होऊन प्रवास झटपट होईल आणि लोकल गाड्यांचेही वेळापत्रक सुरळीत होण्यास मदत मिळेल.

शीव उड्डाणपुलावर हातोडा

कुर्ला – परळ रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गात शीव उड्डाणपुलाचे खांब अडथळा बनत आहेत. त्यामुळे मार्गिकेस विलंब होत आहे. परिणामी, उड्डाणपूल पाडून त्वरित मार्गिका उपलब्ध केली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा हा उड्डाणपूल नव्याने बांधण्यात येईल. त्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

धारावी प्रकल्पबाधिताचे पुनर्वसन करणार

या नव्या मार्गात धारावीचा काही भाग येत असून यामध्ये शेकडो रहिवासी प्रकल्पबाधित होत आहेत. या संदर्भातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन एमएमआरडीएकडून करण्यात येणार असल्याची माहिती सुतार यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land acquisition for fifth sixth railway line upto parel will be completed in four to five months mumbai print news zws