केंद्र आणि राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारत महापरिनिर्वाण दिनी इंदू मिलमध्ये भूमिपूजन करण्याचा रिपब्लिकन नेत्यांच्या निर्धार कडेकोट बंदोबस्तामुळे बारगळला. पोलीस बंदोबस्तामुळे इंदू मिलच्या प्रवेशद्वाराजवळही पोहोचता न आल्यामुळे अखेर रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना पदपथावरच कोनशीला ठेवून स्मारकाचे भूमिपूजन उरकावे लागले.
गुरुवारी रात्री पक्षाच्या युवक आघाडीचे काही कार्यकर्ते समुद्रकिनाऱ्यालगतची भिंत ओलांडून इंदू मिलमध्ये शिरले आणि त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे प्रतिकात्मक भूमिपूजन केले. त्यामुळे शुक्रवारी इंदू मिल परिसरात प्रचंड पोलीस फौजफाटा होता. न्यायालयाच्या आदेशामुळे कोणत्याही परिस्थितीत इंदू मिलमध्ये कोणालाही प्रवेश करू द्यायचा नाही, असा निर्धार पोलिसांनी केला होता. सकाळी ११ च्या सुमारास रामदास आठवले आपल्या समर्थकांसह इंदू मिल परिसरात आले. परंतु पोलीस बंदोबस्तामुळे त्यांना मिलमध्ये प्रवेश करता आला नाही. अखेर इंदू मिलच्या बाहेर पदपथावरच एक कोनशीला ठेवून, बुद्धवंदना म्हणून रामदास आठवले यांनी स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोपस्कार उरकून घेतला.
चैत्यभूमीवर डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील, माणिकराव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, खा. गोपीनाथ मुंडे, महापौर सुनील प्रभू, पालिका आयुक्त सीताराम कुंटे आदींनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा