पावसाच्या पहिल्यात तडाख्यात माहीम आणि दहिसरमधील धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच बुधवारी अ‍ॅन्टॉप हिल येथे दरड झोपडय़ांवर कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. ढिगाऱ्याखाली पाच जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशीरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते.

अ‍ॅन्टॉप हिल येथील शेख मिस्त्री दर्गाह रोडवरील जुन्या टपाल कार्यालयाजवळील टेकडीवरून चार झोपडय़ांवर बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दरड कोसळली. ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या संदीप रामअवतार केवट (२२), रामअवतार पावारू केवट (४५) आणि सलीम शेख (२७) यांना तातडीने शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान संदीप आणि रामअवतार यांचे निधन झाले. ढिगाऱ्याखाली आणखी पाच जण अडकल्याची भीती आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि चिंचोळ्या रस्त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते.

Story img Loader