संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या तडाख्यात होरपळत असताना भारताला मात्र या मंदीची तीव्र झळ बसली नाही. याचे रहस्य भारतासारख्या खंडप्राय देशाच्या बहुभाषिकत्वामध्ये दडले आहे, असे मत ज्येष्ठ भाषा अभ्यासक गणेश देवी यांनी मंगळवारी मांडले. भारतात विविध समाजांची मिळून एक पारंपरिक आणि अनौपचारिक अर्थव्यवस्था आहे. ही अर्थव्यवस्था भाषाभिन्नत्त्वामुळे अधिक भक्कम बनली आहे. या पारंपरिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पूरक अशा अर्थव्यवस्थेनेच मंदीच्या काळात देशाला हात दिला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात मंगळवारी दुपारी ज्येष्ठ भाषा अभ्यासक गणेश देवी यांनी भाषांचा उगम, ७० हजार वर्षांपासूनची भाषांची वाटचाल, भाषेचा विकास आणि अस्त अशा अनेक विषयांवर आपले अभ्यासू मत व्यक्त केले. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या अंगांनी भाषेचा विचार कसा होऊ शकतो, आणि तो करणे कसे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आजवर पाश्चात्य देशांनी पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि गणित या शास्त्रांतील ज्ञानाच्या आधारे प्रगती साध्य केली. औद्योगिक क्रांतीमध्ये या तीन विज्ञानांचा मोठा वाटा होता. मात्र आता भाषा संशोधनातच पुढील प्रगतीचे टप्पे दडलेले आहेत. संगणक विज्ञान, मोबाइल तंत्रज्ञान, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान यांच्या युगात भाषेचे मोल मोठे ठरणार आहे. त्यामुळेच भारताचे बहुभाषिकत्व महत्त्वाचे ठरेल, असे ते म्हणाले.
कोणतीही भाषा कधी स्वत:हून मरत नाही, तर तिला मारले जाते, असे सांगताना, भाषेचे मरण हे एखाद्या पर्वतासारखे असते, अशी तुलना देवी यांनी केली. हा मुद्दा स्पष्ट करताना देवी यांनी म्हशीच्या मृत्यूचे उदाहरण दिले. एखादी म्हैस मरताना आपल्याला समोर दिसते. ते मरण अक्षरश: काही मिनिटांमध्ये होते.
मात्र पर्वत नामशेष होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. भाषा नामशेष होण्यासही अनेक वर्षे जावी लागतात, असे देवी म्हणाले. मात्र भाषा टिकवण्यासाठी माणूस टिकवायला हवा. त्या भाषेतून होणारे आर्थिक, सामाजिक व्यवहार टिकायला हवेत, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
(सविस्तर वृत्तांत रविवारच्या अंकात)
मनुष्य आणि इतर प्राणी यांच्यातील सर्वात मुख्य फरक म्हणजे
भाषा! भाषेशिवाय माणूस मनातल्या मनातही विचार करू शकत नाही. त्यामुळे माणसाच्या उत्क्रांतीमध्ये भाषेची निर्मिती हा खूप महत्त्वाचा टप्पा मानायला हवा. भारतासारख्या देशात तर भाषांचे एवढे वैविध्य आहे की, हे बहुभाषिकत्त्व पुढे आपल्या प्रगतीमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरेल.