डोळ्यांची दृष्टी ठीकठाक करणारी ‘लेसर’ शस्त्रक्रिया ही ‘सौंदर्यवर्धक’ शस्त्रक्रिया असल्याचे सांगून रुग्णांना आरोग्य विम्याचे संरक्षण नाकारणाऱ्या विमा कंपन्यांना यापुढे तसे करता येणार नाही. डोळ्यांवरील लेसर शस्त्रक्रिया ही सौंदर्यवर्धक नसल्याचा स्पष्ट निर्वाळा राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाने दिला आहे. आयोगाचा हा निर्णय अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाने ‘द युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.’चा ‘लेसर’ शस्त्रक्रिया ही ‘सौंदर्यवर्धक’ शस्त्रक्रिया असल्याचा दावा फेटाळून लावला असून, अंधेरी येथील ज्येष्ठ नागरिकाला विम्याच्या ५० हजार रुपयांच्या रकमेसह नुकसानभरपाई म्हणून एक हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. या ज्येष्ठ नागरिकाने डोळ्यांच्या गंभीर आजाराचा सामना केलेला असताना डोळ्यांवर करण्यात येणारी ‘लेसर’ शस्त्रक्रिया ही सौंदर्यवर्धक शस्त्रक्रियाच आहे हे सिद्ध करणारा एकही पुरावा कंपनीने सादर केलेला नाही, असे आयोगाने निकालात नमूद केले आहे.
के. पी. देसाई (६१) यांनी ‘द युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.’कडून १९९० ते १९९७ या कालावधीसाठी आरोग्य विमा घेतला होता. परंतु विम्याचा अंतिम हप्ता भरण्याची मुदत संपण्यापूर्वीच देसाई यांच्या एका डोळ्यावर ‘लेसर’ शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी रुग्णालयाने त्यांच्या हाती ५० हजार रुपयांचे बिल थोपविले. त्यामुळे परताव्यासाठी त्यांनी विमा कंपनीकडे दावा दाखल केला, परंतु देसाई यांनी केलेली शस्त्रक्रिया ही पूर्णपणे ‘सौंदर्यवर्धक’ होती आणि या शस्त्रक्रियेला विम्याचे कवच नाही, असा दावा करून कंपनीने त्यांना शस्त्रक्रियेपोटी खर्च झालेले पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे देसाई यांनी ग्राहक मंचाकडे दाद मागितली. १९९७मध्ये देसाई यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर १९ एप्रिल २००४ रोजी निकाल देताना ग्राहक मंचाने देसाई यांच्या बाजूने निर्णय दिला. त्याला कंपनीने आयोगाकडे आव्हान दिले होते, परंतु देसाई यांनी करारानुसार विम्याच्या योजनेची पाच वर्षे पूर्ण केली. असे असतानाही त्यांनी डोळ्यावर केलेली शस्त्रक्रिया ही ‘सौंदर्यवर्धक’ असल्याचा दावा करून कंपनी नाकारू शकत नाही, असे नमूद करीत आयोगाने कंपनीला देसाई यांना विम्याच्या रकमेसह नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा