गणेशोत्सवानिमित्त १६ ते २४ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश फेरी नाही
मुंबई : इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या अकरावीच्या पाचव्या विशेष प्रवेश फेरीनंतरही मुंबई महानगरातील २४ हजार ७२५ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु गणेशोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील शाळांना तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे १६ ते २४ सप्टेंबर या कालावधीत अकरावी प्रवेशाची कोणतीही फेरी न राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
हेही वाचा >>> राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ, मुंबई पहिल्या तर पुणे दुसऱ्या स्थानावर; विनयभंग, छेडखानी, कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे
शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ अंतर्गत इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे. परंतु अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर वैयक्तिक माहितीसंबंधित असणारा प्रवेश अर्जाचा पहिला भाग आणि महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा दुसरा भाग भरून ठेवायचा आहे. अर्जाचा पहिला व दुसरा भाग भरण्याची प्रक्रिया सुरु असून दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह एटिकेटी विद्यार्थ्यांनाही अर्ज भरता येणार आहे. एटिकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ६०० पैकी प्राप्त झालेले एकूण गुण नमूद करावे. अद्यापही प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून अकरावी प्रवेशाची अखेरची संधी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
हेही वाचा >>> मुंबई : लोअर परळच्या पुलाची करिरोडकडची बाजू वाहतुकीसाठी खुली, सहापैकी तीन मार्गिका रविवारी सकाळपासून सुरू
यंदा अकरावी प्रवेशासाठी मुंबई महानगरक्षेत्रातील तब्बल २ लाख ८८ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील जागांवर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी २ लाख ६३ हजार ६३६ (९१.४३ टक्के) विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. तर अद्यापही २४ हजार ७२५ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. पाचव्या विशेष प्रवेश फेरीनंतरही मुंबई महानगरक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या एकूण १ लाख २४ हजार ५९९ (३२.०९ टक्के) जागा रिक्त आहेत. त्यापैकी केंद्रीय प्रवेशाच्या ९२ हजार ३१८ जागा, तर संस्थांतर्गत, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यांतर्गत ३२ हजार २८१ जागा अद्यापही रिक्त आहेत.